संभाजीनगरमध्ये हृदयद्रावक अपघात..! भरधाव ट्रकने कुटुंबाला चिरडले, वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देत सुमारे १०० फूट फरपटत नेल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली.
या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा अपघात छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद परिसरातील गणपती मंदिराजवळ शुक्रवारी (१९ जुलै) सायंकाळी ४ वाजता घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोपालसिंग चंदनशे (वय ४५), त्यांची मुलगी अवनी उर्फ अनु (वय १०), आणि मुलगा ऋद्र (वय ८) हे साताळा बुद्रुक (फुलंब्री तालुका) येथील रहिवासी होते. ते आपल्या पत्नी मीनाबाई (वय ४०) यांच्यासह दुचाकीवरून गावाकडे जात असताना सिल्लोडकडून येणाऱ्या एका १० चाकी ट्रकने त्यांना धडक दिली.
ट्रकने दुचाकीला फरपटत नेल्याने गोपालसिंग, अवनी आणि ऋद्र यांचा जागीच मृत्यू झाला, तर मीनाबाई बाजूला फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, परंतु त्यांच्या डोळ्यासमोर पती आणि दोन मुलांचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात साताळा फाट्याजवळील वळणावर घडला. ट्रक बांधकाम साहित्य घेऊन संभाजीनगरच्या दिशेने येत होता. धडकेनंतर दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली, आणि ट्रक रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगाऱ्यात अडकला. बचाव पथकाला ट्रक उचलण्यासाठी क्रेन आणि अर्थमूव्हरचा वापर करावा लागला. या अपघातामुळे संभाजीनगर-जळगाव महामार्गावर तासभर वाहतूक कोंडी झाली, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
या घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील इंगळे आणि फुलंब्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय साहने यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मीनाबाई यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेह फुलंब्री येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी ट्रक आणि दुचाकी जप्त केली असून, ट्रक चालकाविरुद्ध वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.





