फक्त वेदना… करूर चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेता विजयचा व्हिडिओ आला समोर, 41 मृत्यूंबद्दल त्याने काय म्हटले?

Actor Vijay Rally : करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दु:खद घटनेवर अभिनेते आणि तमिळगा वेट्री कळगम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओत विजय यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. “मी माझ्या आयुष्यात अशा वेदनादायक परिस्थितीचा कधीही सामना केला नाही. माझ्या मनात प्रचंड वेदना आहे, केवळ वेदना आहे,” असे त्यांनी सांगितले. सुमारे पाच मिनिटांच्या या व्हिडिओत विजय यांनी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थना –
व्हिडिओ संदेशात विजय म्हणाले, “ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. कोणतेही शब्द त्यांच्या नुकसानाची भरपाई करू शकत नाहीत. रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.” त्यांनी पुढे सांगितले की, ते लवकरच या घटनेने प्रभावित झालेल्या सर्व लोकांची भेट घेतील.
— TVK Vijay (@TVKVijayHQ) September 30, 2025
घटनास्थळावरून का निघून गेले?
विजय यांनी घटनेनंतर घटनास्थळावरून का निघून गेले याबाबतही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “माझ्या उपस्थितीमुळे परिस्थिती आणखी बिघडू नये, म्हणून मी तिथून निघून गेलो. करूरच्या सभेत इतकी मोठी दुर्घटना घडली, तेव्हा मी लोकांना सोडून कसा जाऊ शकतो? पण माझ्या तिथे राहण्याने गोंधळ वाढण्याची शक्यता होती, म्हणून मला जावे लागले.”
सत्य लवकरच समोर येईल –
विजय यांनी पुढे सांगितले की, या घटनेचे सत्य लवकरच उघड होईल. “आम्ही आमच्या प्रचारासाठी किमान पाच जिल्ह्यांमध्ये गेलो, तिथे असा कोणताही प्रकार घडला नाही. हा प्रकार फक्त करूरमध्येच घडला. हे कसे झाले? जनता सत्य जाणते, ते सर्व काही पाहत आहे. सत्य लवकरच समोर येईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.





