Disha Salian death :- दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी आम्हाला वेळ लागेल. याप्रकरणी तपासाची एक फेरी पूर्ण झालेली आहे. मात्र त्यानंतर याप्रकरणात कोणतीही प्रगती नाही. त्यामुळे यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याकरता थोडा अवधी देण्यात यावा, अशी विनंती सरकारी वकिल हितेन वेणेगावकर यांनी हायकोर्टात केली. ही विनंती मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने सतीश सालियन यांच्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत तहकूब केली. सतिश सालियन यांनी याचिकेत दावा केला की, दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणंच शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला, असे मला त्यावेळी भासवण्यात आले. मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तसेच मुंबई पोलिसांनी दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सगळे साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या गेल्याचा दावाही या याचिकेतून करण्यात आला आहे.