Healthy Diet Tips: प्रत्येकालाच निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगायचं असतं. मात्र त्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नसून योग्य आहार घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते, आपण रोज जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि आयुष्यावर होतो. त्यामुळे संतुलित आणि पोषक आहार घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हृदय आणि मेंदू निरोगी राहतात आणि ऊर्जा टिकून राहते. विशेषज्ञ सांगतात की, काही ठराविक पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास आयुष्याची गुणवत्ता सुधारू शकते आणि दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. यात प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले पदार्थ महत्त्वाचे असतात. १) हिरव्या पालेभाज्या पालक, मेथी, ब्रोकोली, मोहरीची भाजी यांसारख्या हिरव्या पालेभाज्या अत्यंत पोषक असतात. यामध्ये जीवनसत्त्व A, C, K आणि फोलेट मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक हृदय, डोळे आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटक कमी करण्यास मदत करतात. २) फळे सफरचंद, केळी, संत्री, डाळिंब, स्ट्रॉबेरी यांसारखी फळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. दररोज २-३ वेळा फळांचं सेवन केल्यास पचन सुधारतं आणि हृदय निरोगी राहते. Best Diet ३) सुकेमेवे आणि बिया बदाम, अक्रोड, चिया बिया आणि फ्लॅक्ससीड यामध्ये हेल्दी फॅट्स, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि फायबर असतात. हे घटक मेंदूच्या कार्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. ४) कडधान्ये (डाळी) मूग, मसूर, हरभरा, राजमा यांसारख्या डाळी प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. शरीरातील स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी प्रोटीन आवश्यक असतं. याशिवाय डाळींमध्ये फायबर आणि लोहही मुबलक प्रमाणात असतं, जे पचन आणि रक्ताच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. ५) दही दही हे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम असतं, जे पोटाच्या आरोग्यासाठी आणि हाडांसाठी महत्त्वाचं आहे. दही नियमित खाल्ल्यास पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एकूणच, दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी आपल्या रोजच्या आहारात या पाच गोष्टींचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र, यासोबत नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताण-तणाव नियंत्रणही तितकंच गरजेचं आहे.