आरोग्य सेवकांनो, थॅंक यू…

डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात गुलाब पुष्प देत महापौरांनी व्यक्त केली कृतज्ञता
पुणे – शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या साथीवर मात करण्यासाठी सर्व डॉक्टर, नर्सेस,शासकीय यंत्रणा, प्रसारमाध्यमे, विविध पातळीवर पोलीस यंत्रणा हे सर्व या लढ्यात उतरले आहेत. तर महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयातील कर्मचारीही अहोरात्र जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नायडू रुग्णालयात जात येथील डॉक्टर, नर्स तसेच आरोग्य सेवकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. तसेच या सर्वांसमवेत टाळ्या वाजवत कृतज्ञता व्यक्त केली.
करोनाशी लढा देताना, एका दिवसाचा जनता कर्फ्यू पाळत या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवून, घंटा, शंख, तसेच थाळीनाद करून आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत, महापौर मोहोळ यांनी हा उपक्रम राबवला.
या साथीचा सामना करण्यासाठी आपण सर्वजण जीवाची पर्वा न करता कार्यरत असून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या पाठीशी पुणेकर आहेत. तसेच या साथीला अटकाव घालविण्यासाठी सर्वजण मिळून शहराचे आरोग्य सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू, अशा भावनाही महापौरांनी व्यक्त केल्या.




