चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा

बुलडाणा – गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आरोग्य कर्मचारी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मात्र, कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसह कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी आवक-जावक मध्ये निवेदन दिले. तसेच 15 दिवसात वेतनाचा प्रश्न निकाली नाही लागला तर जिल्हाभर आरोग्य कर्मचारी काम बंद आंदोलन करतील, असा इशारा यावेळी आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी आरोग्य कर्मचारी म्हणाले, जीवाची पर्वा न करता कोविड काळात काम केले. लसीकरण मोहिम प्रखरपणे राबवली. मात्र प्रशासन आम्हाला वेतनापासून वंचित ठेवत आहे. चार महिन्यांपासून आम्हाला वेतन देण्यात आले नाही. आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे. सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. पालकमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे. मात्र अद्याप वेतन मिळाले नाही. तसेच वेतन न मिळाल्यास काम बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.





