धक्कादायक ! नवऱ्याचा पगार थकल्याने महिलेने अधिकाऱ्यापुढेच हातावर केले ब्लेडने वार

बुलढाणा : आरोग्य सहाय्यक असणाऱ्या नवऱ्याचा पगार थकवल्यामुळे एका महिलेने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापुढेच हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना येथे घडली आहे. साहेब जगायला पैसे लागतात, मरायला नाही, असेही महिला अंतःकरणापासून सांगत होती. या घटनेमुळे बुलढाण्याच्या आरोग्य सेवा वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
वनिता ज्ञानेश्वर खंडारे असे हातावर ब्लेड मारून घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिचे पती ज्ञानेश्वर खंडारे हे रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पण मागील 6 महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडले होते. खंडारे यांची काही प्रकरणांत 2016 पासून चौकशी सुरू आहे. तसेच इतर काही प्रकरणांत ते सकृतदर्शनी दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आहे.
यामुळे त्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. गत 6 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे ज्ञानेश्वर खंडारे यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली आहे. यामुळे उदरनिर्वाह चालवणे त्यांना कठीण झाले आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचीही चिंता कुटुंबाला लागली होती. याला कंटाळून ज्ञानेश्वर खंडारे यांच्या पत्नी वनिता यांनी या प्रकरणी न्यायाचे आर्जव करत थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पण तिथेही न्याय मिळाला नाही. उलट त्यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली.





