Health Update: कान्हे परिसरात सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ; काळजी घेण्याचे आरोग्य प्रशासनाकडून आवाहन
Health Update: बदलते हवामान आणि शाळा सुरू झाल्याने लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला व तापाची लागण; आरोग्य प्रशासनाकडून पालकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन.

Health Update – पावसाळ्याची सुरुवात होताच कान्हे, नायगाव, कामशेत तसेच ग्रामीण भागात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसा खवखवणे आणि श्वसनाशी संबंधित आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये या आजारांचे प्रमाण अधिक दिसून येत असून, बदलते हवामान, सततचा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि साचलेले पाणी यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.
पावसाळ्यात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा परस्परांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येत असल्याने सर्दी, खोकला आणि व्हायरल संसर्गाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता वाढते. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांमध्ये लहान मुलांना ताप, घसा दुखणे, सर्दी, खोकला आणि अशक्तपणाची लक्षणे दिसून येत असल्याचे पालकांनी सांगितले.
पावसाळ्यात हवामानात वारंवार होणाऱ्या बदलामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती काही प्रमाणात कमी होते. त्यामुळे किरकोळ संसर्गही लवकर पसरतो. दूषित पाणी, अस्वच्छ परिसर आणि उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमुळेही पोटाचे विकार वाढण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
“पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप किंवा घशाचा त्रास जाणवल्यास मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी पालकांनी विशेष काळजी घ्यावी. मुलांनी उकळून थंड केलेले किंवा शुद्ध पाणी प्यावे. हात स्वच्छ धुणे, बाहेरील उघडे खाद्यपदार्थ टाळणे आणि घराभोवती स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे. ताप किंवा इतर लक्षणे वाढल्यास स्वतःहून औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”
– डॉ. रोहित काळे, वैद्यकीय अध्यक्ष, कान्हे





