Heavy Rain : अतिवृष्टीमुळे शेतशिवार जलमय; भातरोपे कुजण्याच्या मार्गावर
Heavy Rain : शेतकरी चिंतेत

कान्हे – तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, त्याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पेरलेली पिके आणि भातरोपे कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.
सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. काही ठिकाणी नुकतीच उगवलेली भातरोपे पिवळी पडू लागली असून, दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यास ती पूर्णपणे कुजण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अतिवृष्टीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून अनेक लघुउद्योग आणि व्यावसायिक उपक्रमांवरही झाला आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्ते खराब झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणेही कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करावेत आणि योग्य आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. हवामानातील बदलामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता अतिवृष्टीचे नवे संकट उभे ठाकले आहे.
‘सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पेरलेली पिके आणि भातरोपे कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. वेळेत पाणी ओसरले नाही, तर मोठे आर्थिक नुकसान होईल.’ – बाळू वाघमारे, शेतकरी, साते
pune : पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूक बदल





