Satara News : कोयनेच्या डोंगररांगांमध्ये आरोग्यक्रांती..; ‘स्मार्ट’ झाले हेळवाकचं प्राथमिक आरोग्य केंद्र

कोयनानगर : कधी काळी धुक्यात हरवलेलं, साधनसामग्रीअभावी हतबल झालेलं हेळवाकचं प्राथमिक आरोग्य केंद्र आज ‘स्मार्ट पीएचसी’च्या रूपात कोयन्याच्या आरोग्य सेवेचा नवा चेहरा ठरतंय. दुर्गम कोयना भागातील हे केंद्र हे मागासलेल्या आरोग्यव्यवस्थेचं प्रतीक होतं.
अपुरी इमारत, कमी कर्मचारी, औषधसाठ्याचा तुटवडा आणि तपासणीसाठी पाटण वा कराडची धाव हीच तेव्हाची खरी स्थिती. पण आता परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते” हे वाक्य आज खरं होताना दिसतंय… कोयनेच्या डोंगररांगांमध्ये आरोग्यक्रांती सुरू झाली आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने ‘स्मार्ट पीएचसी’ संकल्पना राबवण्यात आली. निरामय आरोग्य अभियानाच्या जोरावर हेळवाकच्या आरोग्य केंद्राने घेतलेली झेप खरंच उल्लेखनीय आहे.
आता या केंद्रात आहे सुसज्ज व स्वच्छ इमारत, संगणकीकृत आरोग्य नोंदी, प्रशिक्षित कर्मचारी, टेलिमेडिसिन सेवा, आणि नियमित तपासण्या. औषधांचा पुरेसा साठाही इथे कायम राखण्यात येतो, असे सरपंच गजानन कदम यांनी सांगितले.
“पूर्वी किरकोळ ताप, सर्दीसाठी पाटणला जावं लागायचं. आता इथेच वेळेवर उपचार मिळतो. सुसज्ज इमारतीमुळे आमच्यासाठी ही फार मोठी सुविधा आहे.” हेळवाक पीएचसी आता केवळ एक दवाखाना नाही, तर कोयना परिसरात विश्वासाचं आणि प्रगतीचं प्रतीक ठरतंय.
आरोग्याच्या दृष्टीने हे एक पथदर्शी केंद्र ठरत आहे. “आरोग्य हा हक्क आहे, भाग्य नाही. हेळवाक पीएचसीच्या बदलातून दुर्गम भागातील आरोग्यसेवेची नवी दिशा दिसते आहे. अशाच प्रकारची सेवा कोयना विभागातल्या इतर गावांतही पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.





