Nagar | वैद्यकीय पथकाकडून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

निघोज, (वार्ताहर) – पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांनी पारनेर तालुक्यातील वारकरी दिंडी सोहळा पायी वारीतील भाविकांची आरोग्याची काळजी घेत बुधवारी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत पन्नासपेक्षा जास्त दिंड्यांना भेट देऊन प्रत्येक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करीत त्यांना मोफत औषधे देऊन सेवाभाव जपला.
या असोसिएशनचे हे दुसरे वर्ष असून, यामध्ये प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करीत त्यांना औषधे देण्याचे काम पारनेर तालुक्यातील वैद्यकीय पथकाने केले आहे. यामध्ये निमा संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोकराव सरोदे, डॉ, अजित लंके डॉ, सुनिल कदम, डॉ. बाळासाहेब घोगरे, डॉ.पांडुरंग थोरात, डॉ. बेलोटे, डॉ. कांडेकर, डॉ. श्रीमंदीलकर, डॉ. आढाव, डॉ. बी.बी. झावरे आदींनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सेवाभाव केला आहे.
यामध्ये प्रामुख्याने भाऊसाहेब कोल्हे अध्यक्ष असलेली रामदास महाराज दुसाणे दिंडी सोहळा, थोरात महाराज यांची कुंड माऊली मळगंगा दिंडी सोहळा, गोरक्ष ढवण यांची कानिफनाथ दिंडी सोहळा, दत्तात्रय रसाळ यांची संत सावता दिंडी सोहळा तसेच अशोक सावंत यांची श्री संत निळोबाराय पालखी सोहळा आदी पन्नासपेक्षा जास्त दिंडी सोहळ्यातील पायी वारी भावीकांची वैद्यकीय पथकाने सुश्रुषा केली आहे.
ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अशोकराव सरोदे म्हणाले,या निमित्ताने वारीचा अनुभव कसा असतो याची माहिती तसेच प्रत्यक्ष वारकऱ्यांची सेवा म्हणजे प्रत्यक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा होत आहे. गेल्या वर्षापासून ही वैद्यकीय सेवा मोफत तसेच अनेक वारकऱ्यांना तब्बल तीस हजार रुपयांची औषधे मोफत दिली. आम्ही जे काही करीत आहोत ती एक सेवाभावी वृत्ती असून, आम्ही सुद्धा वारकऱ्यांएवढेच भाग्यवान असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.





