Turbid Water : गढूळ पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Turbid Water :

चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, मोशी तसेच परिसरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नळातून येणाऱ्या पाण्याचा रंग पावसाच्या साचलेल्या पाण्यासारखा दिसत असून त्यामध्ये माती, गाळ आणि इतर अशुद्ध घटक असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पाणी काही वेळ भांड्यात ठेवल्यानंतर तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असून जलजन्य आजारांचा धोका वाढलेला असतो. अशा परिस्थितीत महापालिकेकडून गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबांकडे पिण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांना हेच पाणी वापरण्याची वेळ येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप केला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांमध्ये गळती, दूषित पाण्याचा शिरकाव किंवा पाइपलाइनमधील गाळ यामुळे ही समस्या उद्भवत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून जलवाहिन्यांची स्वच्छता करावी, आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करावी तसेच नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ऐन पावसाळ्यात होत असलेल्या या गढूळ व दूषित पाणीपुरवठ्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
Pune District : कृषी यांत्रिकीकरण, चारसूत्री भात लागवडीचा राजगडमध्ये यशस्वी पॅटर्न





