Pune District : कृषी यांत्रिकीकरण, चारसूत्री भात लागवडीचा राजगडमध्ये यशस्वी पॅटर्न
Pune District : करंजावणे येथील प्रगतशील शेतकरी विजय लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात नुकतेच या भात लागवड यंत्राचे यशस्वी प्रात्यक्षिक पार पडले.

विंझर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, राजगड आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने राजगड तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण आणि चारसूत्री भात लागवड मोहिमेला अभूतपूर्व वेग मिळाला आहे. कमी खर्च, कमी मनुष्यबळ आणि अधिक उत्पादनाचे सूत्र डोळ्यांसमोर ठेवून येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत उत्साहाने स्वीकार केला आहे.
तालुक्यातील करंजावणे येथे यंत्राद्वारे भात लागवड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. राजगड सेंद्रिय शेती शेतकरी बचत गटाने सामूहिक सहभागातून अत्याधुनिक भात रोपलागवड यंत्र खरेदी केले आहे. या यंत्राच्या साहाय्याने कमी वेळेत आणि अत्यंत कमी मनुष्यबळात मोठ्या क्षेत्रावर लागवड करणे शक्य झाले आहे. करंजावणे येथील प्रगतशील शेतकरी विजय लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात नुकतेच या भात लागवड यंत्राचे यशस्वी प्रात्यक्षिक पार पडले.
तालुका कृषी अधिकारी सुनीलकुमार ईडोळे, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत भोसले, अंबवणेचे सहाय्यक कृषी अधिकारी महेश जगताप, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन निगडे, रमेश बेलेकर, निलेश अपदागिरे (बीटीएम, आत्मा), राजगड सेंद्रिय शेती शेतकरी बचत गटचे अध्यक्ष विशाल पोळ तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त अवलंब करून आपला उत्पादन खर्च घटवला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून शेती फायदेशीर व शाश्वत बनविण्याची हीच योग्य वेळ आहे.
-सुनीलकुमार ईडोळे, तालुका कृषी अधिकारी.
चारसूत्री लागवड पद्धतीचे प्रमुख फायदे
रोपांची योग्य व वैज्ञानिक अंतरावर लागवड.
उपलब्ध पाण्याचा अत्यंत कार्यक्षम वापर.
खतांचा संतुलित वापर व उत्पादन खर्चात मोठी बचत.
भाताच्या उत्पादनात विक्रमी वाढ.
पीक विम्याबाबत कृषी विभागाचे महत्त्वपूर्ण आवाहन
सध्या हवामानामध्ये सातत्याने होणारे बदल आणि लहरी मान्सून लक्षात घेता, शेतकरी बांधवांनी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या धोक्यापासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी आपल्या पिकांचा पीक विमा ऑनलाइन पद्धतीने वेळेत भरून घ्यावा, असे आवाहनही तालुका कृषी अधिकारी श्री. सुनीलकुमार ईडोळे यांनी यावेळी केले आहे.





