Health Alert : पुणेकर गारठले! थंडीच्या लाटेने वाढवले आजारपण, डॉक्टरांनी दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरासह उपनगरांत हुडहुडी भरणाऱ्या बोचऱ्या थंडीने पुणेकर चांगलेच गारठले आहेत. यामुळे सर्दी, ताप, खोकला या संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले असून, अस्थमा, संधिवात आणि हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी थंडीत विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डाॅक्टरांनी केले आहे.पुणे शहरातील थंडीचा पारा ८ अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
सर्दी, ताप, खोकला, घसा आणि डोकेदुखी असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली. वेळीच उपचार घेतले नाहीत, तर आजार बळावत असून, कफ, खोकल्याने निमोनियाचा धोका उद्भवत आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच रुग्णांनी तात्काळ डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.थंड हवामानामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर ताण येतो. धमन्या आणि शिरा घट्ट होतात आणि रक्त जाड झाल्याने रक्ताभिसरण कमी होते.
रक्त पंप करण्यासाठी हृदय जास्त मेहनत करते. त्यामुळे हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. विशेषतः जर उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह यांसारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असतील, तर थंडीत व्यायाम करताना, आधी वॉर्म अप करा आणि वारंवार ब्रेक घेत व्यायाम करा. दम्याच्या रुग्णांनी इनहेलर घेऊन प्रवास करावा.
हे करावे…
– उबदार कपडे परिधान करावेत.
– संतुलित आहार घ्यावा.
– पुरेशी झोप, व्यायाम आवश्यक.
– वैयक्तिक स्वच्छता पाळावी.
हे करू नये
– सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
– थंड पेये, आईस्क्रीम व बर्फाचे पदार्थ टाळावे.
– धूम्रपानाने श्वसनसंबधी आजाराचा धोका वाढतो
– डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका
“थंडीमध्ये वृद्ध, गरोदर माता, लहान मुले, सहव्याधी असणारे आणि दर्घकालीन आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. सर्दी, ताप, खोकला, घशात खवखव, धाप, अंगदुखी असल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. जास्त ताप, श्वास घेण्यास त्रास, त्वचा किंवा ओठ निळसर रंगाचे होणे, थुंकीत रक्त आढळल्यास रुग्णालयात दाखल व्हावे.”
– डाॅ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका





