13 विद्यार्थीनींवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकाला मृत्यूदंड

बांदुंग, (इंडोनेशिया) – शाळेतील विद्यार्थिनींवरच बलात्कार केल्याबद्दल इंडोनेशियातील एका शाळेच्या मुख्याद्यापकाला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या मुख्याद्यापकाने पाच वर्षांच्या कालावधीमध्ये इस्लामी बोर्डिंग स्कूलमधील 13 विद्यार्थिनींवर बलात्कार केला होता.
या बलात्कारामुळे या विद्यार्थिनींपैकी काही जणी गर्भवतीही राहिल्या होत्या. या आरोपांमध्ये हेरी विरॅवान या मुख्याध्यापकाला इंडोनेशियातील उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पिठाने दोषी ठरवले होते. फेब्रुवारी महिन्यातच स्थानिक जिल्हा न्यायालयाने या मुख्याध्यापकाला दोषी ठरवले होते.
हे प्रकरण देशभर गाजले होते. 2016 पासून 2021 पर्यंत विरॅवान हा 11 ते 14 वर्षे वयाच्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करत होता. या बलात्कारामुळे आतापर्यंत 9 बालकांचाही जन्म झाला आहे. या प्रकरणातील पीडीत मुली खूप घाबरल्या असल्यामुळे त्यांनी याची वाच्यता कोठेही केली नव्हती.
बानदुंग उच्च न्यायालयाने या प्रकरणी समाजामध्ये निर्माण झालेल्या रोषाची गंभीर दखल घेऊन आरोपीला देहदंडाची शिक्षा सुनावली आहे.





