Pune : कॅनेलच्या कडेला झोपला होता पोलीस आले अन्…; वाचा स्वारगेट प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम

पुणेः राज्याला हादरून सोडणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री १ वाजता शिरुर तालुक्यातील एका गावातून पोलिसांनी अटक केली. स्थानिक गावकरी आणि स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली. घटना घडलेल्यानंतर तब्बल ७५ तासांनी पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.
गुनाट गावाच्या शिवारातून नराधम दत्तात्रय गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी एका शेतातील कॅनलच्या बाजूला झोपला असताना त्याला पकडण्यात आले आहे. स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून सकाळी ११ वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र, घटना आणि त्यानंतरच्या ७५ तासांमध्ये गाडेबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या होत्या.
थोडक्यात घटना
मंगळवारी स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची बातमी समोर आली. काही क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहरासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली. पीडित तरूणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य घेत आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली.
पोलीस पथके गुणाट गावात
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीच्या शोधासाठी सुरूवातीला १० आणि नंतर १३ पथके रवाना केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी ही पथके त्याच्या शिरूरमधील गुणाट गावात दाखल झाली. काल दिवसभर पोलिसांनी डॅाग स्कॅाड आणि ड्रोनद्वारे आरोपीचा शोध घेतला. पण आरोपीचा शोध लागला नाही. आरोपी त्याच्या नातेवाईकाच्या घरी पाणी प्यायल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल दिवसभर तपास करण्यात आला. पण आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.
गावकऱ्यांची मदत
मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने आरोपीला एका शेतातील कॅनेलजवळून ताब्यात घेतले. यासाठी पोलिसांना स्थानिक गाकऱ्यांची मोठी मदत मिळाली. पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या अटकेच्या कारवाईत गुनाट गावच्या नागरिकांनी यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली असल्याचे सांगितले. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला जिथून अटक केली तिथे काही कपडे आणि गोधडी देखील आढळून आल्याची माहिती आहे.
आरोपीला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार
दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशनला त्याचा जबाब नोंदवून घेतला जात होता. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. दत्तात्रय गाडेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून त्याला सकाळी 11 वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.




