‘तोही आमचा मुलगा आहे…’ सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमबाबत नीरज चोप्राच्या आईने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यापासून वंचित राहिला. यावेळी त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. नीरजने रौप्य पदक जिंकल्यानंतरही संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. नीरजच्या घरातही त्याच्या या कामगिरीमुळे आनंदाचे वातावरण आहे. नीरजच्या या आश्चर्यकारक कामगिरीनंतर त्याची आई खूप आनंदी दिसली. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने विक्रमी 92.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नीरज चोप्राने 89.45 मीटर भालाफेक करून इतिहास रचला. नीरजच्या या यशानंतर एएनआयने त्याच्या आईशी चर्चा केली. नीरजच्या यशानंतर नीरजची आई खूप आनंदी दिसली आणि म्हणाली की,’नीरजच्या या यशाने आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्हाला रौप्य देखील सोन्यासारखे वाटते, परंतु ज्याने सुवर्ण जिंकले तो देखील आमचा मुलगा आहे कारण तिथले सर्वजण कठोर परिश्रम करून इथपर्यंत पोहोचले आहेत.’
नीरजला दुखापत झाली होती
नीरजच्या आईने सांगितले की,’हा खेळाडूंचा दिवस आहे आणि नीरजने सुवर्णपदक गमावले, परंतु आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. त्यांच्या आगमनानंतर त्यांच्या आवडीचे जेवण तयार करू. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान नीरजला किंचित दुखापत झाली होती. नीरजच्या या यशाचा त्याच्या पानिपत येथील घरी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि लाडूही वाटण्यात आले.’
अर्शद नदीमने ऑलिम्पिक विक्रम मोडला
पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक विक्रम मोडला आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटरची जबरदस्त थ्रो केली. ज्यासह त्याने सुवर्णपदक जिंकले. या थ्रोने भालाफेकचा जुना विक्रम मोडला आहे. बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये नॉर्वेजियन ॲथलीट थोरकिल्डसेन अँड्रियासने 90.57 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली होती. ज्याला आता अर्शद नदीमने तोडून आपल्या नावावर केले आहे.
नीरज चोप्राने आपल्या मोसमातील दुसरा सर्वोत्तम थ्रो केला
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नीरज चोप्राने दुसरे स्थान पटकावले. त्याने पाचपैकी चार प्रयत्नांत फाऊल केले. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने ८९.४५ मीटर भालाफेक केली. त्यामुळे त्याला रौप्यपदक मिळाले. हा फेक त्याचा या मोसमातील दुसरा सर्वोत्तम थ्रो ठरला.





