Bagulbua Film: तो येतोय….!!! ‘बागुलबुवा’ मराठीतील पहिला AI चित्रपट; हॉलिवूडची झलक
Bagulbua Film:

Bagulbua Film: मराठी चित्रपटसृष्टीत पाहिल्यांदाच एआयच्या माध्यमातून ‘बागुलबुवा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मराठी चित्रपटाने तंत्रज्ञानात झालेले बदल स्वीकारून आजवरची वाटचाल सुरू केली. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळातही हे तंत्रज्ञान आत्मसात करून मराठी चित्रपटाची भव्यता वाढवली आहे.
या चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे खरे कलाकार घेऊन एआयच्या माध्यमातून हा चित्रपट तयार करण्यात आला असून असा नाविन्यपूर्ण प्रयोग करून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे. बागुलबुवा या चित्रपटाचे टायटल टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून हॉलिवूडसारखा भासणारा हा टायटल टीजर आहे.
एस एस फिल्म्स प्रॉडक्शनने चित्रपटाची निर्मिती केली असून शरद पाटील, अंजली पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अभिनेता, दिग्दर्शक चेतन चावडा यांनी या चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केले असून नितिन चव्हाण यांनी पटकथा लेखन, विनोद राजे यांनी संकलन, अथर्व चव्हाण यांनी व्हीएफएक्स, आकाश पांडे यांनी स्टोरीबोर्ड केला आहे. मेटाफेक्स प्रोडक्शनने या चित्रपटाच्या एआयचे काम पाहिले आहे.
आदिती द्रविड यांनी लिहिलेल्या गीतांना गीत साई पियूष यांचे संगीत लाभले आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर या चित्रपटात झळकणार असून अन्य ५५ दमदार कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. याशिवाय या चित्रपटात आणखी एक सरप्राइज पाहायला मिळणार असून त्याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याने चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
या चित्रपटातील कथानक पुणे आणि परिसरात घडत असल्याचं दिसतं. अचानक एक संकट येत आणि त्याच्याकडे पाहिल्यावर डोळे बिघडतात अशी स्थिती होते. संकट म्हणून आलेला हा ‘बागुलबुवा’ म्हणजे नेमकं काय आहे याचं उत्तर चित्रपटातूनच मिळणार आहे.





