Sonam Wangchuk : वयाच्या 9 वर्षांपर्यंत शाळाच पाहिली नव्हती; आज देशातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ कसे बनले सोनम वांगचुक?
Sonam Wangchuk : त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात असून या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Who is Sonam Wangchuk? पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणासारख्या गंभीर मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण पुकारलं आहे. आजचा उपोषणाचा २० वा दिवस असून दिल्लीतील जंतर मंतर येथे त्यांचे उपोषण सुरू आहे.
उपोषणामुळे वांगचुंक यांची प्रकृती खालावली असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर वजन घटले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात असून या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सोनम वांगचुक नक्की कोण आहेत त्यांच्यविषयी जाणून घेऊयात….
वयाच्या नऊ वर्षांपर्यंत शाळेचे तोंडही पाहिले नाही.
लडाखच्या दुर्गम आणि बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये वाढलेले सोनम वांगचुक यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटातील ‘फुन्सुक वांगडू’ या पात्राची प्रेरणा म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. मात्र पडद्यावरील कथा जितकी रोचक आहे, त्याहून अधिक संघर्षमय जीवन वांगचुक यांनी अनुभवले आहे.
१९६६ मध्ये लडाखमधील अल्ची या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्या काळी गावात शाळेची सुविधा नसल्याने वयाच्या नऊ वर्षांपर्यंत त्यांनी शाळेचे तोंडही पाहिले नव्हते. त्यांच्या आईने घरातच लडाखी भाषेत त्यांना वाचन-लेखन शिकवले. याच शिक्षणाने त्यांच्या जिज्ञासू स्वभावाचा मजबूत पाया घातला.
फ्रान्समध्ये जाऊन अर्थन आर्किटेक्चरचे विशेष प्रशिक्षण
पुढे वडिलांनी जम्मू-काश्मीरच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांना दिल्लीतील केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळाला. तिथून त्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. १९८७ मध्ये त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), श्रीनगर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची बी.टेक पदवी संपादन केली. इंजिनिअरिंगनंतर त्यांनी फ्रान्समध्ये जाऊन अर्थन आर्किटेक्चरचे विशेष प्रशिक्षण घेतले. या ज्ञानाचा वापर त्यांनी लडाखच्या कठीण हवामानाला अनुरूप, पर्यावरणपूरक घरे उभारण्यासाठी केला.
आइस स्तूपा’ संकल्पना जगभरात गाजली.
१९८८ मध्ये त्यांनी ‘SECMOL’ (Students’ Educational and Cultural Movement of Ladakh) या संस्थेची स्थापना केली. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीने शिकण्याची संधी देत त्यांनी शिक्षणाची वेगळी वाट निर्माण केली. लडाखमधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी विकसित केलेली ‘आइस स्तूपा’ संकल्पना जगभरात गाजली. हिवाळ्यातील पाणी बर्फाच्या स्वरूपात साठवून उन्हाळ्यात शेतीसाठी उपलब्ध करून देणारी ही कल्पना पर्यावरण संवर्धनातील महत्त्वाचा टप्पा ठरली.
प्रवास आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी
तसेच ‘HIAL’ (Himalayan Institute of Alternatives, Ladakh) या पर्यायी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी अनुभवाधारित शिक्षणाची नवी संकल्पना रुजवली. वयाच्या नऊव्या वर्षापर्यंत शाळेपासून दूर असलेला एक मुलगा पुढे जगभरातील शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा देणारा विचारवंत ठरला. संघर्ष, जिद्द आणि नवकल्पनांच्या जोरावर उभा राहिलेला सोनम वांगचुक यांचा प्रवास आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी मानला जातो.
सोनम वांगचुक यांना झाली होती अटक
नेपाळमध्ये झेन झी चळवळ उदयास आली होती, त्यावेळी सोनम वांगचुक यांचा महत्वाचा वाटा राहिला होता. या प्रकरणी सोनम वांगचुक यांना त्यांच्या गावातून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिल्यानंतर सोनम वांगचुक यांची सुटका करण्यात आली.






