Boney Kapoor and Sridevi Love Story : श्रीदेवीच्या प्रेमात पडले, पण एक सत्य समजताच अभिनेत्रीला बसला होता धक्का; नेमकं काय घडलेलं?
Boney Kapoor and Sridevi Love Story : श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. पत्नीच्या आठवणी आजही त्यांना सतावत असल्याचं त्यांनी अनेकदा मुलाखतींमधून सांगितलं आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रेमकहाणीचा खास किस्सा.

Boney Kapoor and Sridevi Love Story : बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा आज ७१ वा वाढदिवस. ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘पुकार’, ‘नो एंट्री’, ‘मॉम’ आणि ‘वॉन्टेड’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या बोनी कपूर यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांची खासगी जीवनातील प्रेमकहाणीही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबतची त्यांची प्रेमकहाणी, पहिली भेट आणि लग्नापर्यंतचा प्रवास आजही अनेकांच्या लक्षात आहे.
श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. पत्नीच्या आठवणी आजही त्यांना सतावत असल्याचं त्यांनी अनेकदा मुलाखतींमधून सांगितलं आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रेमकहाणीचा खास किस्सा.
राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहण्यापासून बॉलिवूडमधील यशापर्यंतचा प्रवास
बोनी कपूर यांचा जन्म मेरठ येथे झाला. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचं स्वप्न घेऊन ते मुंबईत आले. मात्र, सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत संघर्षाचा होता. एकेकाळी त्यांना कुटुंबासह दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहावं लागलं होतं.
बोनी कपूर यांचं खरं नाव अचल कपूर आहे. ते अभिनेते अनिल कपूर आणि संजय कपूर यांचे मोठे भाऊ आहेत. कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठं यश मिळवलं आणि बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं.
‘सोल्वा सावन‘च्या सेटवर झाली पहिली भेट
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची पहिली भेट ‘सोल्वा सावन’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. श्रीदेवी यांच्या अभिनयाने बोनी कपूर प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना भूमिका देऊ केली. या चित्रपटासाठी त्यांनी श्रीदेवी यांना तब्बल ११ लाख रुपये मानधन देऊ केलं होतं. त्या काळात ही रक्कम विशेष चर्चेचा विषय ठरली होती.
विवाहित असल्याचं समजताच श्रीदेवींना बसला होता धक्का!
बोनी कपूर यांनी एकदा श्रीदेवी यांच्यासमोर आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या. मात्र, बोनी कपूर आधीच विवाहित असून त्यांना दोन मुलं असल्याचं समजल्यानंतर श्रीदेवी यांना मोठा धक्का बसला होता. बोनी कपूर यांचं १९८३ मध्ये मोना शौरी कपूर यांच्याशी लग्न झालं होतं. या लग्नातून त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुलं झाली होती.
या घटनेनंतर काही काळ बोनी आणि श्रीदेवी यांच्यात संवादही झाला नव्हता. मात्र, श्रीदेवी यांच्या आईच्या आजारपणात बोनी कपूर यांनी त्यांना मोठा आधार दिला. या काळात दोघांमधील जवळीक वाढत गेली.
१९९६ मध्ये बांधली लग्नगाठ
अनेक चढ-उतारांनंतर अखेर बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी १९९६ मध्ये लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या संसारात जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुलींचं आगमन झालं. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा संसार अनेक वर्षे सुखाने सुरू होता.
मात्र, २०१८ मध्ये श्रीदेवी यांच्या निधनाने कपूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या जाण्याने बोनी कपूर यांच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. आजही ते श्रीदेवी यांच्या आठवणींमध्ये रमलेले दिसतात.





