प्रभात वृत्तसेवा पुणे – सरकारी नोकरदार असलेल्या मुकबधिर तरुणाने गरीब घरातील मुलीशी लग्नगाठ बांधत तिला उच्चशिक्षित करीत सरकारी नोकरी लावली. दोघांनी मिळून संसार उभा करीत दोन मुलांना वाढवले. मात्र, सुखी संसाराच्या २० वर्षांनंतर नात्यात संशय वाढू लागला आणि एमेकांविरोधातील वाढलेल्या मतभेदांनी त्यांचे आयुष्य वेगवेगळ्या वळणांवर येऊन उभे केले. कौटुंबिक न्यायालयातील चार मध्यस्थी सत्रांनंतरही समेटाचा तो एक धागा पकडता न आल्याने अखेर या दाम्पत्याचा घटस्फोट न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला. त्यांचे भांडण ३ वर्षे सुरू होते.वासू आणि सपना (दोघांचीही नावे बदलेली आहेत). दोघेही मूळचे सोलापूरचे परंतु सध्या कोंढवा येथे स्थायिक. वासू हा उच्चशिक्षित मूकबधिर तर सपना ही गरीब घरातील. त्याने सपनाशी लग्न करीत तिला उच्चशिक्षण देत सरकारी नोकरी लावली. यादरम्यान, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलगा हा पदवीधर असून, मुलगी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. लग्नाच्या वीस वर्षांनंतर दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागले. हे वाद इतके विकोपाला गेले की एकत्रित घेतलेल्या सदनिकेचे हप्तेही दोघांनी भरले नाहीत. परिणामी, सदनिका बॅंकेने जप्त केली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांविरोधात न्यायालयात खटले दाखल केले.मागील तीन वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेला वाद पाहता न्यायधीशांनी हे प्रकरण प्रशिक्षित मध्यस्थ ॲड. ईब्राहिम अब्दुल शेख यांच्याकडे मध्यस्थीसाठी पाठविले. त्यांनी चार वेळा मध्यस्थी केली. पत्नी ५० लाख रुपये तर पती २ लाख पोटगीवर ठाम होते. मध्यस्थीनंतर दोघेही १२ लाख रुपये पोटगी व मुलांचा ताबा पत्नीकडे राहील यांसह विविध अटी-शर्तीं मंजूर करीत एकमेकांवरील गुन्हे मागे घेण्यास तयार झाले. तसेच, न्यायालयानेही त्यांनी परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मंजूर करीत दोघांचाही मार्ग मोकळा केला. त्याचा मोठा भाऊ बनला ढाल पती-पत्नीच्या वादात मूकबधिर भावाच्या पाठीमागे मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहिला. न्यायालयात लहान भाऊ हातवारे करीत होता तर मोठा भाऊ ते शब्दांद्वारे वकील तसेच न्यायाधीशांपुढे मांडत होता. शब्दांचे सामर्थ्य नसतानाही त्याच्या भावनांचा भार प्रत्येक वेळी मध्यस्थी कक्षासह न्यायालयात जाणवत होता. हा भावनिक क्षण कक्षातील प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होता. “मध्यस्थी दरम्यान दोघांनाही पुन्हा एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्न झाले. कधी पतीच्या हातवाऱ्यांनी तर कधी पत्नीच्या डोळ्यांतील पाण्याने वातावरण भरून जात होते. मात्र, जखमा खोल होत्या आणि समेटाचा मार्ग पुन्हा बंद होत होता. चार मध्यस्थींनंतरही मनातील दरी कमी न झाल्याने दोघांनी वेगळे होण्याचा मार्ग अवलंबला.” – ॲड. ईब्राहिम अब्दुल शेख, उच्च न्यायालय नियुक्त मध्यस्थ, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण