BMC Election 2025 : ठाकरे बंधूंच्या युतीवर पडदा कायम ! प्रभाग रचनेनंतरही प्रस्ताव नाही, आतल्या गोटातून माहिती बाहेर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रभाग रचनेचे आदेश जारी झाले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातर्फे अद्याप युतीसंदर्भात कोणताही अधिकृत प्रस्ताव समोर आलेला नाही.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात त्या दिशेने कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते युतीस अनुकूल असले तरी मुख्य नेत्यांदरम्यान संवादाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतरच या युतीसंदर्भातील चर्चांना अधिकृत रूप मिळू शकते. सध्या मात्र दोन्ही पक्ष आपापल्या ताकदीचा आढावा घेत असून स्वतंत्र तयारी करत आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश काढले असून ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील महापालिकांमध्ये निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेत २२७ एकसदस्यीय प्रभाग राहणार असून इतर महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग ठेवले जाणार आहेत.
उद्धव ठाकरेंचे 12 शिलेदार मैदानात
मुंबई महानगरपालिका पुन्हा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) पक्षाने मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. महापालिका निवडणुकीसाठी सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिल्यानंतर लगेचच ठाकरे गटाने मैदानात झेप घेतली असून, पक्षाचे 12 उपनेते विशेष जबाबदाऱ्यांसह नियुक्त करण्यात आले आहेत.
महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्याची तयारी
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी संघटनात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाची विधानसभा निहाय बांधणी पूर्ण होत असून, मराठी मतदार, पायाभूत सुविधा, आणि प्रशासनावरील नियंत्रण या मुद्द्यांवर ठाकरे गट आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे.





