Sachin Goswami : ‘माझा छकुला’मध्ये फक्त एका सीनसाठी झळकला; आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गाजवणारा ‘हा’ अभिनेता कोण?
Sachin Goswami : या चित्रपटातील एका छोट्याशा सीनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sachin Goswami : मराठी चित्रपटसृष्टीतील काही चित्रपट असे आहेत, जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली तरी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. १९९५ च्या आसपास प्रदर्शित झालेला ‘माझा छकुला’ हा असाच एक गाजलेला चित्रपट. महेश कोठारे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आजही टेलिव्हिजनवर हा चित्रपट लागला की प्रेक्षक आवर्जून पाहतात.
या चित्रपटातील एका छोट्याशा सीनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या सीनमध्ये झळकलेला अभिनेता आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘माझा छकुला’मध्ये आदिनाथ कोठारे आणि त्यांची आई मुंबईला आल्यानंतर एसटीमधून खाली उतरतात. त्यावेळी एक हमाल त्यांच्याकडील बॅग जबरदस्तीने उचलतो. त्यानंतर बॅग उचलण्यावरून दोघांमध्ये वाद होतो. हा छोटासा प्रसंग चित्रपटातील महत्त्वाचा भाग नसला, तरी त्यात दिसणाऱ्या अभिनेत्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सचिन गोस्वामी आहेत. सोशल मीडिया क्रिएटर गौरव यांनी सचिन गोस्वामी यांचा या सीनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी सचिन गोस्वामी यांना ओळखल्याचं सांगितलं आहे.
सचिन गोस्वामी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. टेलिव्हिजनवरही त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र, अभिनयासोबतच त्यांनी पुढे लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली.
सचिन गोस्वामी यांनी ‘गुलकंद’, ‘मस्त चाललंय आमचं’ आणि ‘एक डाव भटाचा’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, ‘माझा छकुला’ या चित्रपटात आदिनाथ कोठारे, निवेदिता सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रविंद्र बेर्डे, अंबर कोठारे, बिपीन वर्ती, मधू कांबीकर, विजय पाटकर आणि पूजा पवार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटातील कलाकार आणि त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.






