“छान काम करा असं ते नेहमी आम्हाला सांगायचे”, ज्येष्ठ अभिनेते सावरकर यांच्या निधनाने प्रशांत दामले भावूक

मुंबई – मराठी-हिंदी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उद्या 25 जुलै रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा कौस्तुभ आणि मुलगी सुवर्णा असे कुटुंब आहे.
जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी 1954 पासून त्यांनी सुरू केलेली अभिनयाची कारकीर्द वयाच्या 73व्या वर्षांपर्यंत सुरू राहिली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) सारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. त्यांनी 100हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये काम केले होते.
गेल्या काही दिवासांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्यावर 15 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर ते बरे झाले होते. काल संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करत त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले. पण त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती अभिनेते जयवंत वाडकर यांनी दिली.
जयंत सावरकर 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. राजा परांजपे, सुरेश हळदणकर, अनंत दामले, केशवराव दाते, जयराम शिलेदार, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, अद्वैत दादरकर, मंगेश कदम अशा अनेक जुन्या-नव्या पिढीतील दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले आहे. “वाहिनीची माया, “पैसा पैसा’, “आराम हराम है’ आदी चित्रपट आणि “श्रीयुत गंगाधर टिपरे’, “अरे वेड्या मना’, “अस्मिता’ अशा गाजलेल्या मालिकांमधूनही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या हे एकदम फिट होते. ते नेहमी पॉझिटिव्ह होते. मानसिकरित्या ते अतिशय खणखर होते. ते दररोज व्यायाम करायचे. ते आज आपल्यात नाही ही फार दु:खाची गोष्ट आहे. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिलेले आहेत. छान काम करा असं ते नेहमी आम्हाला सांगायचे. माणसाने शारिरीकच नाही तर मानसिकदृष्ट्याही फिट असायला हवं असं ते सांगायचे. अतिशन अभ्यासपूर्ण काम ते करायचे. मन लावून काम करायचे, अशी प्रतिक्रिया मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले यांनी दिली.





