HDFC Bank Q2 Result: एचडीएफसी बँकेला दुसऱ्या तिमाहीत ‘बंपर’ नफा; 18 हजार कोटींचा आकडा ओलांडला!

HDFC Bank Q2 Result: देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने सप्टेंबर २०२५ ला संपलेल्या तिमाहीत दमदार कामगिरी करत बाजारातील तज्ज्ञांचे अंदाज खोटे ठरवले आहेत. या तिमाहीत बँकेने तब्बल १८,६४१.३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत हा नफा १०.८ टक्क्यांनी अधिक आहे. बाजारातील तज्ज्ञांनी १६,७१४ कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त केला होता, त्यापेक्षा हा आकडा खूपच चांगला आहे. इतर उत्पन्नातील मोठी वाढ आणि मुख्य व्यवसायातील मजबुती यामुळे हा नफा वाढल्याचे मानले जात आहे.
मुख्य उत्पन्नात ४.८% ची वाढ:
बँकेच्या मुख्य उत्पन्नापैकी एक असलेल्या नेट इंटरेस्ट इनकम (NII) मध्ये (कर्जावरील व्याज आणि ठेवींवर दिलेल्या व्याजातील फरक) ४.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा आता ३१,५५१.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी ३०,११३.९ कोटी रुपये होता. बाजाराने केवळ ३ टक्क्यांची वाढ (३१,१०५ कोटी रुपये) अपेक्षित धरली होती, पण बँकेने त्यापेक्षा जास्त कामगिरी केली.
इतर उत्पन्नात २५ टक्क्यांची भरारी!
बँकेच्या ‘इतर उत्पन्ना’त (Non-Interest Income) चक्क २५ टक्क्यांची जोरदार वाढ झाली असून, तो १४,३५० कोटी रुपये झाला आहे. या उत्पन्नातील वाढ बँकेच्या एकूण कमाईला मोठा हातभार लावणारी ठरली आहे.
प्रोव्हिजन्समध्ये वाढ, पण स्थिती नियंत्रणात:
संभाव्य तोटा किंवा खराब कर्जांसाठी बाजूला काढल्या जाणाऱ्या ‘प्रोव्हिजन्स आणि कंटिंजन्सीज’ मध्ये २९.६ टक्क्यांची वाढ झाली असून, तो आकडा ३,५००.५ कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी हा आकडा २,७००.५ कोटी रुपये होता. प्रोव्हिजन्समध्ये झालेली ही वाढ लक्षणीय असली तरी, बँकेचे एकूण तिमाही निकाल सकारात्मक राहिले आहेत.
‘ऍसेट क्वालिटी’त सुधारणा:
बँकेच्या ऍसेट क्वालिटीत वार्षिक आधारावर सुधारणा दिसून आली आहे. ग्रॉस नॉन-परफॉर्मिंग ऍसेट्स (GNPA) रेश्यो १.३६ टक्क्यांवरून घसरून १.२४ टक्क्यांवर आला आहे. हे बँकेच्या कर्ज वसुलीतील मजबूत कामगिरीचे द्योतक आहे.
एचडीबी फायनान्शियलच्या आयपीओचा मोठा आधार:
या तिमाहीत एचडीएफसी बँकेच्या उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या आयपीओमुळे बँकेला एक मोठा ‘वन-टाईम गेन’ मिळाला आहे. आयपीओमधील ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) अंतर्गत बँकेने शेअर्सची विक्री केली, ज्यामुळे ३० सप्टेंबर २०२५ ला संपलेल्या सहामाहीत आयपीओशी संबंधित खर्च वजा जाता ९,१२८.४ कोटी रुपयांचा प्री-टॅक्स गेन झाला. या गेनमुळे बँकेच्या एकूण नफ्याला प्रचंड आधार मिळाला आहे.
एकंदरीत, हे तिमाही निकाल दर्शवतात की एचडीएफसी बँक आव्हानात्मक वातावरणातही आपली स्थिरता टिकवून प्रगती करत आहे.




