HC Order – मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन पत्नीसोबत संबंध ठेवण्याच्या प्रकरणात एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. अल्पवयीन पत्नीच्या सहमतीनेही शारीरिक संबंध ठेवणे बेकायदेशीरच असून अशा प्रकरणांमध्ये पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात आरोपीची दोषसिद्धी कायम ठेवत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती गोविंद सनप यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. न्यायालयाने आपल्या निकालात, “कायद्याच्या दृष्टीने पीडित पत्नी अल्पवयीन असेल, तर तिच्या सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंधही बलात्कार किंवा लैंगिक अत्याचारच मानले जातील.” यासंदर्भात कायद्यात कोणतीही सूट नाही. मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल, तर ती पत्नी असूनही शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार म्हणूनच वर्गीकृत केले जाईल, असे ठामपणे सांगितले आहे. या प्रकरणात आरोपीने असा युक्तिवाद केला होता की, पीडित मुलगी त्याची पत्नी होती आणि तिच्या संमतीनेच संबंध प्रस्थापित करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा चालवणे योग्य नाही. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला आणि आरोपीला दोषी ठरवले. कोर्टाच्या या निर्णयाने कायद्याच्या चौकटीतून पती पत्नीच्या नात्याला नव्याने परिभाषित केले आहे. कोर्टाने असेही नमूद केले की, बालविवाह हाच एक गुन्हा असून अल्पवयीन मुलीसोबत कोणतेही लैंगिक संबंध ठेवणे तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.