मीना नदीच्या पाण्यात घातक धातू, पारा

मानवी आरोग्यस धोकादायक : प्रदूषण रोखण्याची सर्वांची जबाबादारी – डॉ. मोघे
नारायणगाव : मीना नदीच्या पाण्याचे नमुने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासल्यानंतर त्यामध्ये काही घातक धातू, पारा व कीटकनाशके आढळून आले आहेत. घातक पदार्थ नदीकाठच्या परिसरातील विहिरीत झिरपून जात असल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
मीना नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी देशाच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे, यशदाचे जलसाक्षरता विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक सुमंत पांडे, गेली 20 वर्षापासून काम करीत असलेले जीवित नदी संकल्पनेचे संस्थापक शैलजा देशपांडे, पीएचडी इन जॉग्रफी असलेल्या व सिम्बॉयसिसमधून सेवानिवृत्त झालेल्या स्वाती डोळे-दीक्षित काम करीत आहेत.
नारायणगाव शहरातून वाहणाऱ्या मीना नदीच्या वाढलेल्या प्रदूषणावर 2019 पासून कृषिरत्न पुरस्कार प्राप्त अनिल मेहेर व नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या पुढाकाराने संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्यादरम्यान कॉलेजचे प्राध्यापक जमादार यांनीही मीना नदीच्या पाण्याचे नमुने तपासून संशोधन केले होते. मीना नदीतील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी राजेंद्र सिंह, माधव गाडगीळ यांनी या प्रकल्पाला जनजागृती करून दिशा दिली होती.
डॉ. मोघे म्हणाले की, दैनंदिन जीवनात प्रत्येक कुटुंबाने पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करावा. “माझी नदी, माझी जबाबदारी’ ओळखून नैसर्गिक घटकांचा वापर करावा. (उदा. सकाळी टूथपेस्ट ऐवजी दंतमंजन, लाकडी ब्रश, लाकडी कंगवा, कापडी पिशवी, उटणे, रिठा शिकेकाईपासून शाम्पू) घरातून वाहून जाणारे पाणी 60 ते 70 टक्के उत्तम गुणवत्तेचे असल्यास नदीचे पाणी प्रदूषित होणार नाही. यासाठी 108 महिलांना सौर ऊर्जा, वनस्पतीच्या बिया, वनस्पतीची राखेचा वापर करून पाणी शुद्ध केले जाते. याबाबत पर्यावरण पूरक प्रशिक्षण देण्यात आले.
मीना नदीचे पाणी शेतीमध्ये रासायनिक खतांचा होणारा वापर व पाण्यात मिसळणारे सांडपाणी यामुळे पाणी प्रदूषित होत असल्याचे लक्षात आले आहे. आज 15 ते 20 कुटुंबात एक कॅन्सर रुग्ण आढळून येत आहे. भविष्यात प्रत्येक कुटुंबात एक कॅन्सर रुग्ण आढळून आल्यास नवल वाटायला नको. त्यामुळे आपण सर्वांनी पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी गांभीर्याने व एकत्रितपणे काम करायला हवे.
– योगेश पाटे, सरपंच, नारायणगाव





