Haveli Elections : आरक्षण ठरवणार राजकीय भविष्य ; हवेलीतील इच्छुकांची धडपड सुरू

प्रभात वृत्तसेवा
लोणी काळभोर – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम झाली असून आता सगळ्यांचे लक्ष सोमवारी (दि. 13) ऑक्टोबरकडे लागले आहे. याच दिवशी आरक्षण जाहीर होणार आहे. कुठल्या गट-गणात आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी जाईल, यावरच अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.आरक्षण जाहीर होईपर्यंत इच्छुकांची धडपड सुरू असून, आपल्या प्रभागात हवे तसे आरक्षण पडेल का? या प्रश्नाने अनेकांची झोप उडाली आहे.
राज्यात महायुती सत्तेवर असली तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महायुती एकत्र लढवणार की स्वतंत्र, तसेच महाविकास आघाडीची भूमिका काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आपला मतदारसंघ युतीतील दुसर्या पक्षाला मिळाला तर काय? असा प्रश्न उमेदवारांना सतावत आहे.प्रशासनाने नुकतीच अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे.
हवेली पंचायत समितीच्या हद्दीत असलेली शेवाळेवाडी, शिवणे, मुंढवा, केशवनगर, साडेसतरा नळी, खडकवासला, न-हे आंबेगाव, धायरी, लोहगाव ही गावे आता पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने या भागांचा प्रभागातून वगळण्यात आला आहे. तर फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांना स्वतंत्र नगरपरिषद दर्जा मिळाला आहे.
सन 2017 मधील निवडणुकीत हवेली तालुक्यातून 13 जिल्हा परिषद सदस्य आणि 26 पंचायत समिती सदस्य निवडले गेले होते.
मात्र, महानगरपालिकेची हद्दवाढ झाल्याने आगामी निवडणुकीत ही संख्या कमी होऊन 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती सदस्य इतकी राहणार आहे. 2012 मध्ये हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. यशवंत सहकारी साखर कारखाना बंद करण्याच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेनेने प्रचार रंगवला होता आणि बहुतांश जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. 2017 मध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे गटसंख्या वाढली, पण त्यानंतरच्या हद्दबदलामुळे पुन्हा जागा कमी झाल्या.
स्थानिक मुद्द्यांची झळ..
शहरालगत असलेल्या हवेली तालुक्यात नागरीकरण झपाट्याने वाढत असले तरी पायाभूत सुविधा मागे पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था आणि नियोजनाचा अभाव या कारणांनी नागरिक त्रस्त आहेत. ग्रामपंचायतींच्या आर्थिक स्थिती आणि नियोजनक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे विकासाच्या अनेक योजना कागदावरच अडकल्या आहेत.
राजकीय वार्याची दिशा कोणत्या बाजूने?
राज्यात महायुती सत्तेवर आणि केंद्रात भाजप असल्याने अनेक इच्छुक उमेदवार त्या पक्षांच्या जवळीक साधताना दिसतात. काही आधीच प्रवेश घेत आहेत, तर काही वार्याची दिशा बघून उडी घेतील, असा अंदाज आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतरच उमेदवारांचे समीकरण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत पारावरच्या राजकीय गप्पांना जोर आला असून हवेली तालुका पुन्हा एकदा निवडणुकीच्या रंगात रंगणार हे निश्चित आहे.





