मुंबईच्या राजकारणात खळबळ..! ठाकरेंचे 3 नगरसेवक फुटले? महापौर आता शिंदेंचाच?

कल्याण-डोंबिवली : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी सत्ता स्थापनेवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच कल्याण-डोंबिवली महापालिकेत मोठी उलथापालथ झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील तीन नगरसेवक फोडल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे महापौरपदासाठी घोडेबाजार सुरू झाल्याची चर्चा आहे. येथे बहुमतासाठी 62 नगरसेवकांचा जादुई आकडा आवश्यक आहे. सध्या शिंदे गटाकडे 53, भाजपाकडे 50, ठाकरे गटाकडे 11 तर मनसेकडे 5 नगरसेवक आहेत. ठाकरे गटातील तीन नगरसेवक फुटल्यास सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.
सूत्रांनुसार, ठाकरे गटाचे नगरसेवक मधूर मात्रे यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी भेट झाली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याशिवाय नगरसेविका कीर्ती ढोणे आणि रेशमा निचळ हेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ उडाली असून महापौरपदावर शिंदे गटाची बाजी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





