चेंगराचेंगरीमध्ये सापडल्यास स्वतःचा बचाव कसा कराल? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

हाथरसमधील नारायण साकार बाबा उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 122 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली. सत्संगाचा कार्यक्रम हाथरसमधील सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलराई येथे आयोजित करण्यात आला होता. याआधीही देशात धार्मिक कार्यक्रम किंवा धार्मिक स्थळांवर अनेक चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो तर अनेक जण जखमी होतात. या गोष्टी नेमक्या कशामुळे होतात? या चेंगराचेंगरीपासून वाचण्यासाठी आपण काय करावे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया….
1) बाहेर पडण्याच्या मार्गावर विशेष लक्ष द्या
तुम्ही गर्दीच्या कार्यक्रमाला जाणार असाल तर नेहमी प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर लक्ष ठेवा. मार्ग शोधण्यासाठी अनेकदा लोक एकमेकांना धक्का देऊन पुढे जातात. याशिवाय मुख्य गेटऐवजी इतर मार्गांवर लक्ष ठेवा.
2) ठिकाणाबद्दल माहिती जाणून घ्या
कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केला आहे त्या ठिकाणाची किंवा ठिकाणच्या परिसराची आगाऊ माहिती घ्या. असे केल्याने तुम्हाला त्या ठिकाणाची आगाऊ माहिती मिळेल आणि गर्दीतून सहज बाहेर पडण्यास तुम्हाला मदत होईल. यासोबतच कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या नेहमी तयार राहावे.
3) विरुद्ध दिशेने धावू नका
जेव्हा चेंगराचेंगरी होते, तेव्हा बरेचदा लोक न पाहता किंवा न समजता पळू लागतात. जर तुम्ही अशा परिस्थितीत अडकलात तर गर्दीच्या विरुद्ध दिशेने कधीही धावू नका. नेहमी प्रवाहासोबत जा. कारण तुम्ही गर्दीशी दोन हात करू शकत नाही.
4) छातीला कव्हर करा
गर्दीत अडकल्यावर, बॉक्सर ज्या प्रकारे स्वत: ला झाकतो, त्याच प्रकारे आपल्या हातांनी आपली छाती नेहमी झाका. असे केल्याने तुमची छाती सुरक्षित राहील. एकमेकांना चिकटून पळल्याने गुदमरल्यासारखे वाटते. यावेळी ऑक्सिजनची कमतरता जाणवते.
5) पडलात तर तिरकं व्हा
गर्दीत पडल्यास लगेच उठण्याचा प्रयत्न करा. काही कारणांमुळे तुम्हाला उठता येत नसेल, तर तुमचे शरीर वाकवा. तुमचे दोन्ही पाय तुमच्या छातीजवळ ठेवून आणि डोक्यावर हात ठेवून स्वतःचे रक्षण करा.





