Pune District | इंदापूर विधानसभेत आमदार दत्तात्रय भरणे यांची हॅट्ट्रिक

इंदापूर, -इंदापूर विधानसभेची निवडणूक पहिल्यांदाच तिरंगी झाल्याने अतिशय अटीतटीची मानली जात होती; परंतु आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील केलेला विकास, तालुक्यातील लाडक्या बहिणींचा मिळलेला प्रचंड प्रतिसाद व ओबीसी समाज बांधवांनी दिलेली एकजुटीची साथ, यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सलग तीन वेळा इंदापूर विधानसभेत यश मिळवत हॅट्ट्रिक निर्माण केलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे व अपक्ष उमेदवार प्रवीण माने या तीन उमेदवारामध्ये प्रामुख्याने विधानसभेत लढत झाली. बहुतेक कौल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने येताना दिसले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील विजयी होतील, असे मागील काही दिवसांपासून बोलले जात होते; मात्र करण्यात आलेले निवडणुकीतील मतांचे सर्वे खोटे ठरवत, पहिल्या फेरीपासून सतराव्या फेरीपर्यंत 22124 मतांची आघाडी आमदार भरणे यांनी घेतली. तर विसाव्या फेरीत आमदार भरणे यांनी 97271 मते मिळवली. हर्षवर्धन पाटील यांना 76546 मते मिळाली, त्यामुळे 20,725 मताधिक्य राहिले होते. व 21 व्या फेरीत भरणे यांना 1,01750 तर हर्षवर्धन पाटील यांना 81129 इतके मतदान मिळाले. त्यामुळे आमदार भरणे यांचा विजय निश्चित मानला गेला.
यामध्ये खर्या अर्थाने अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवून देखील चांगली मते पदरात पाडून घेतली. प्रवीण माने अपक्ष उभा राहिले नसते तर, कदाचित हर्षवर्धन पाटील विजयी झाले असते. प्रवीण माने 21 फेरीपर्यंत 32,982 मते घेतली होती. आमदार भरणे यांना उजनी जलाशयाचा बॅकवॉटर परिसर, तसेच भिगवन पासून हिंगणगाव पर्यंत मतदारांनी मोठी साथ दिली आहे. तर गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी गावाने आधीचे मतदान देत आमदार भरणे यांचे रेकॉर्ड मोडले. इंदापूर शहराने आमदार दत्तात्रय भरणे यांना 528 मतांचे लीड दिले. ज्या प्रमाणात अपेक्षा होती, त्या प्रमाणात साथ दिल्यामुळे, विजयाचा मार्ग आमदार दत्तात्रय भरणे यांचा सुकर झाला. तालुक्यातील वालचंदनगर, बावडा, भिगवण व इंदापूर शहरात कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत, आनंद व्यक्त केला आहे. आमदार भरणे हे सरकारमध्ये सामील होणार असून, त्यांना नक्कीच लाल दिव्याची गाडी मिळेल, मंत्रीपद मिळेल असा आशावाद कार्यकर्ते बोलून दाखवत होते.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, युवक नेते श्रीमंत ढोले, अभिजीत तांबिले, दीपक जाधव, संजय सोनवणे, दत्तात्रय घोगरे, संग्राम पाटील, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील सामान्य जनता, माझ्या कामावर विश्वास ठेवून, माझ्या पाठीशी खंबीरपणी उभी राहिली. तर तालुक्यातील लाडक्या भगिनींनी मताच्या रूपाने मला भरभरून आशीर्वाद दिले, आगामी काळात तरुण बळीराजा शेतकरी व सर्व घटकातील जनतेला विकास कामातून न्याय देण्याची भूमिका, यशस्वी घेतली जाईल.
-दत्तात्रय भरणे, विजयी उमेदवार इंदापूर





