Hasan Mahmud Hattrick : बांगलादेशी पेसरचा अबू धाबीत थरार! कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील नोंदवली ५० वी हॅटट्रिक; भारताच्या विक्रमाशी बरोबरी
Hasan Mahmud Hattrick : हसन महमूदने अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यात हॅट-ट्रिक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो पहिला बांगलादेशी वेगवान गोलंदाज ठरला आहे.

BAN vs AFG Test Hasan Mahmud Hat-Trick 5 Wickets Record Equalled India : बांगलादेशचा २७ वर्षीय वेगवान गोलंदाज हसन महमूदने (Hasan Mahmud) अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात थरारक गोलंदाजी करत क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. शेख झायेद स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात महमूदने २१ षटकांत अवघ्या ५५ धावा देऊन ५ बळी टिपले. डावाच्या ८३ व्या षटकात सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाजांना तंबूत धाडत त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ५० वी हॅटट्रिक नोंदवण्याचा अनोखा पराक्रम केला. कसोटीत हॅटट्रिक घेणारा तो बांगलादेशचा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे.
८३ व्या षटकात उडवला त्रिफळा; लागोपाठ तीन चेंडूंत तीन विकेट्स!
हसन महमूदने ८३ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर इस्मत आलम (१), चौथ्या चेंडूवर कैस अहमद (०) आणि पाचव्या चेंडूवर झिया-उर-रहमान अकबर (०) यांना बाद करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. या ऐतिहासिक कामगिरीसह तो आलोक कपाली (२००३, वि. पाकिस्तान) आणि सोहाग गाझी (२०१४, वि. न्यूझीलंड) यांच्यानंतर कसोटीत हॅटट्रिक घेणारा बांगलादेशचा केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे.
हॅटट्रिकच्या विक्रमात भारताची बरोबरी; अव्वल स्थानी इंग्लंड!
A five-for, including a hat-trick 👏
Hasan Mahmud continues to impress in Test cricket in 2026 🇧🇩
#Cricket #AFGvBAN https://t.co/lGbcd7q44p
— Wisden (@WisdenCricket) October 11, 2026
हसन महमूदच्या या कामगिरीमुळे सर्वाधिक कसोटी हॅटट्रिक नोंदवणाऱ्या देशांच्या यादीत बांगलादेशने भारताच्या ३ हॅटट्रिकच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. भारताकडून हरभजन सिंग (२००१), इरफान पठाण (२००६) आणि जसप्रीत बुमराह (२०१९) यांनी हा पराक्रम केला आहे. या जागतिक यादीत १५ हॅटट्रिकसह इंग्लंड अव्वल स्थानावर असून ऑस्ट्रेलिया (१२) दुसऱ्या आणि पाकिस्तान (६) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कसोटी कारकिर्दीत ५० विकेट्सचा टप्पा पूर्ण; ४ वेळा ५ विकेट्स!
आपला १७ वा कसोटी सामना खेळणाऱ्या हसन महमूदने या सामन्यादरम्यान आपल्या कसोटी कारकिर्दीत ५० विकेट्सचा टप्पाही ओलांडला. एप्रिल २०२४ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या महमूदने आतापर्यंत चार वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केला असून ५५ धावांत ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.





