काश्मीर मुद्द्यावर अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली आहे का? कॉंग्रेसचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षविरामाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच, काश्मीर मुद्द्यावर अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली आहे का, असा सवाल मोदी सरकारला केला. संघर्षविरामाची घोषणा ज्या पद्धतीने झाली त्यावरून कॉंग्रेसने सरकारला घेरले. त्यासाठी पक्षाचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली.
भारत आणि पाकिस्तानच्या वतीने प्रथमच तिसऱ्या देशाने घोषणा केली. ती आम्हाला सर्वांनाच चकित करणारी ठरली. भारत आणि पाकिस्तानशी संबंधित काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे. अमेरिकेसह इतर कुठला देश त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही अशी भारताची भूमिका आहे. मध्यस्थीला कुठला वाव नसल्याचे आपले स्पष्ट परराष्ट्र धोरण आहे. मात्र, प्रथमच भारत आणि पाकिस्तानमधील मुद्द्यांचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. ते योग्य नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. सरकारने देशाला आणि सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
अमेरिकेने सोशल मीडियावरून केलेल्या घोषणेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात आम्ही पडणार नाही, असे अमेरिकेने दोन दिवसांपूर्वीच म्हटले. त्यानंतर अचानकपणे घडामोडींमध्ये बदल झाला. कुठल्या अटींवर संघर्षविराम जाहीर करण्यात आला? पाकिस्तान पुन्हा काही करणार नाही याची गॅरंटी काय? समझोत्याचे उल्लंघन करणाऱ्या घटना घडल्या, याकडे पायलट यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या कामगिरीचा सर्वांनाच अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.





