Team India : ….तर हार्दीक पंड्याला भारतीय संघात पुनरागमन करणे होणार कठीण

Shivam Dube, Hardik Pandya : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्या दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. त्याचे तंदुरुस्तीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्यालाही भारत विरूध्द अफगाणिस्तान टी-20 मालिकेत खेळायचे होते मात्र, दुखापतीमुळे त्याला या मालिकेला मुकावे लागले. त्याच्या जागी संघात जागा मिळालेल्या शिवम दुबेने पहिल्याच सामन्यात शानदार फिनिशिंग खेळी करत भारताला विजयापर्यंत नेले.
दुबेने 40 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 60 धावा केल्या होत्या. यापूर्वी, गोलंदाजी करताना शिवमने 1 बळी घेतला होता आणि 2 षटकात केवळ 9 धावा दिल्या होत्या. या अष्टपैलू कामगिरीनंतर हार्दिक पांड्याची जागा शिवम दुबे घेऊ शकतो आणि आगामी स्पर्धेमध्ये भारतीय संघात दुबेला स्थान मिळू शकते , या चर्चेला वेग आला आहे. तसेच या मालिकेतील उर्वरित सामन्यत दुबे याने असेच सातत्य राखले तर पंड्याला संघात पुनरागमन करणे कठीण होणार आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेल्या शिवम दुबेने अशा वेळी चमकदार कामगिरी केली जेव्हा हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मुख्य अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय संघाची पहिली पसंती असलेला हार्दिक पांड्या 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दुखापतग्रस्त झाला होता आणि आतापर्यंत तो पुनरागमन करू शकला नाही.
#INDvAFG 2nd T20 : कोहलीच्या परतण्याचा रोहितवर दबाव; ‘या’ तीन खेळाडूंपैकी एकाचा पत्ता होणार कट…
हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे शिवम दुबेला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून संधी मिळाली आहे. शिवम दुबेने पहिल्या सामन्यात बॅट आणि बॉल या दोन्हीसह अप्रतिम कामगिरी केली. जर शिवम दुबेने आगामी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर तो हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून उदयास येऊ शकतो आणि टी-20 विश्वचषकासाठी दावाही करू शकतो.
दुबेची आतापर्यंतची कारकीर्द…
शिवम भारताकडून पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत 1 वनडे आणि 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकमेव एकदिवसीय सामन्यात शिवमने फलंदाजी करताना 9 धावा केल्या आणि गोलंदाजीत त्याला यश मिळाले नाही. याशिवाय, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 12 डावांमध्ये फलंदाजी करताना शिवमने 35.33 च्या सरासरीने आणि 139.47 च्या स्ट्राईक रेटने 212 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 2 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 60* धावा होती आणि T20I च्या 17 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत.






