“राज्यात रोड सेफ्टी म्हणजे कचरा कुंडीचा विषय झालाय का”? हिंजवडीतील दुर्घटनेवर जितेंद्र आव्हाडांचा सवाल, पोस्ट लिहित सरकारला विचारला जाब

Jitendra Awhad | काल दि. १९ मार्च रोजी पुण्यातील हिंजवडी फेज वन येथे कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागण्याची दुर्घटना घडली. बसचा मागील दरवाजा लॅाक झाल्याने या दुर्घटनेत ४ जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना इंजिनमधील बिघाड होऊन बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेनंतर अशा प्रकारच्या खाजगी बसने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट लिहित विविध प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे. राज्यात रोड सेफ्टी म्हणजे कचरा कुंडीचा विषय झालाय का असा सवाल आव्हाड यांनी या पोस्टमधून उपस्थित केला आहे. तसेच विविध प्रश्न देखील या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी उपस्थित केले आहेत.
अपघाताचे प्रमाण २ % ने वाढले
ह्या निर्दयी प्रशासनाला हे दृश्य दिसत नाही कि डोळ्यांवर पट्टी बांधली आहे….. राज्यात रोड सेफ्टी म्हणजे कचरा कुंडीचा विषय झालाय का ? मागील वर्षी तब्बल ३५,००० हुन अधिक रस्ते अपघात घडले आहेत, जे २०२३ च्या तुलनेत जवळपास २ % ने प्रमाण वाढले आहे. त्यापैकी १५,००० अधिक सर्व सामान्य नागरिकांनी आपले अमूल्य असे प्राण अचानक गमावले आहे …….. त्यांच्या आई, बहीण, बायको, छोटे छोटे चिल्ले पिल्ले…..कित्येक जण अजूनही त्यांची वाट पाहत असतील. काय त्यांच्या अश्रूंची किंमत ह्या सरकारला आहे का ? हा माझा जाहीर सवाल ह्या मस्तवाल यंत्रणेला आहे……… रस्ते बनविणे आणि त्याची देखभाल करणे हा तर ह्या सरकारचा आवडता विषय आहे…….
अरे थोडी जनाची नाही मनाची तरी
किती कोटी येतात आणि कित्येक कोटी जातात याची आकडेवारी आली, तर वेड लागायची पाळी येईल …. बरं सगळं कसे हवाहवाई आहे…… रस्ते बनवणार कसे याचे निर्णय एखाद्या पंचतारांकित केबिनमध्ये घेतले जातात …..प्लॅन कसा करणार ……डी.पी कसा आणि कुठून न्यायचा वैगरे वैगरे……. आज वयाची ६० वर्ष गाठलीय मी………अजूनही एकही माईचा लाल परिवहन किंवा रस्ते बांधकाम विभागातला भेटला नाही. ज्याला खरेच असे रस्त्यांवर घडणारे अपघात टाळायचे आहेत… अरे थोडी जनाची नाही मनाची तरी बाळगा ….. आज हा अपघात हिंजवडीमध्ये घडला उद्या दुसरीकडे घडेल आणि नेहमी घडतच राहतात …
ह्या निर्दयी प्रशासनाला हे दृश्य दिसत नाही कि डोळ्यांवर पट्टी बांधली आहे…..
राज्यात रोड सेफ्टी म्हणजे कचरा कुंडीचा विषय झालाय का ?
मागील वर्षी तब्बल ३५,००० हुन अधिक रस्ते अपघात घडले आहेत जे २०२३ च्या तुलनेत जवळपास २ % ने प्रमाण वाढले आहे त्यापैकी १५,००० अधिक सर्व सामान्य… pic.twitter.com/1iJ032tNwO— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 19, 2025
आरोटीओवर ओढले ताशेरे
खड्डे खोदले म्हणून अपघात ……गाडीने अचानक पेट घेतला म्हणून अपघात असे अनेक कारणे… अरे मग ते तुमचे आर.टी.ओ काय झक मारते का ….. कश्या गाड्या पास होतात कसा मलिदा खातात……. एक एक अधिकारी दिवसाची कमाई लाखो रुपये खातो कुठे जाते तुमची जबाबदारी …गाड्या चेक करता ना बे तुम्ही ……… टेम्पो ट्रॅव्हलर हि गाडी फोर्स मोटर्स ची आहे ………चार जीव जाळले तुम्ही ……अरे काय करताय काय ? ओढा त्या फोर्स मोटर्सला आणि जाब विचारा चार निष्पाप जीव अचानक गेले ……लाकडासारखे राख झाले ……कोण जबाबदार आहे ……..
आहे हिंमत कोणामध्ये
आर. टी. ओ कि ती कंपनी कि सरकार कि अजून कोणी …….. त्याची धग जाणून घ्यायची असेल ना तर छोटीशी माचीस ची काडी घ्या आणि द्या अंगाला चटके मग समजेल तुम्हाला हे जिवंत शरीर जळताना काय वेदना झाल्या असतील ते………….. थोडी नैतिकता असेल तर घ्या जबाबदारी आहे का हिंमत कोणामध्ये ? अशी पोस्ट आमदार जितेंंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केली आहे. या दुर्घटनेचा त्यांनी सरकारला जाब विचारला आहे.





