Sanjay Raut : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलीनीकरणाबाबत प्रतिक्रिया दिली होती. यानंतर शरद पवार यांनी आज ४ फेब्रुवारीला माध्यमांशी संवाद साधला. त्या चर्चेत देवेंद्र फडणवीस नसल्याने त्यांना याबद्दल बोलण्याचा काय अधिकार? असा थेट सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. यावर आता खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी उपस्थित केलेल्या सवालास पाठिंबा दर्शवत विलीनीकारणाचा विषय पवार कुटुंबातील होता. फडणवीस यांचा अट्टाहास कामाचा नाही, असा खोचक टोला लगावला. राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड झाली असून, राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही बातम्यांनुसार, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, याविषयी स्वतः प्रफुल्ल पटेल यांना हा दावा फेटाळून लावत मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. राष्ट्रीय अध्यक्षाबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा आग्रह राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी धरला जात आहे. राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार हे निवडण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांनी केलेल्या या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “प्रफुल्ल पटेल यांना पवार कुटुंबाचा प्रमुख केलं आहे का?” असा खोचक सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. काय म्हणाले राऊत? “हिंदू संस्कृतीत 13 दिवसांचा शोक पाळला जातो. राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष शरद पवारांचा पक्ष होता, पटेलांचा नाही. ते मोदी आणि शाह यांचे भक्त आहेत. अमित शाह त्यांना जे आदेश देतील तो निर्णय पटेल घेतील,” असा टोलाही संजय राऊतांनी पटेलांना लगावला. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्ये आहेत. त्यांच्या पक्षतील 90 टक्के लोक वतनदार आहेत. मुश्रीफ हल्ली देशाला, महाराष्ट्राला खूप प्रवचन देत असतात. जेव्हा त्यांच्या घरी ईडीची धाड पडली तेव्हा तुमच्यासारखे धिप्पड लोक कुठे होते हे राज्याने पाहिलं आहे. अनेक मोठे नेते गेले तेव्हा भाजपाने जाहिराती दिल्या नव्हत्या, असेही राऊत म्हणाले आहेत. हेही वाचा : Korean Lover Game: सॉरी मम्मी-सॉरी पापा, कोरियन कल्चर… ; तीन सख्ख्या बहिणींची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या