Haryana Election Results 2024 । आज हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागणार आहे. त्यामुळे भाजप सत्तेत राहणार की बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागणार हे स्पष्ट होणार आहे. पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या काँग्रेसबाबतही चित्र स्पष्ट होणार आहे. हरियाणा निवडणुकीच्या निकालाचे ट्रेंड समोर येऊ लागले आहेत. हरियाणातील 90 जागांसाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत, त्यांचा विजय आणि पराभव पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांवरून ठरवला जाईल. राज्यात 101 महिला उमेदवारही आहेत. सत्ताधारी भाजपसोबतच विरोधी पक्ष काँग्रेस, जेजेपी, आयएनएलडी, बसपा, एएसपी, आम आदमी पार्टीचे उमेदवारही रिंगणात आहेत. येथे 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून 20 हजारांहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. हरियाणात मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासाभरात काँग्रेस पक्षाने 60 जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष हरियाणात सत्ता स्थापन करणार, असे संकेत मिळत होते. त्यामुळे दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनची तयारी सुरु केली होती. याठिकाणी काँग्रेसने जिलेबी वाटायला सुरुवात केली होती. मात्र, सुरुवातीला दीड तास उलटल्यानंतर हरियाणातील मतमोजणीत एक ट्विस्ट आला. सुरुवातीच्या तासाभरात 30 जागांचीही वेस न ओलांडलेल्या भाजपने अचानक मुसंडी मारत आता 50 जागांपर्यंत आघाडी घेतली आहे. तर सुरुवातीच्या टप्प्यात 60 जागांवर आघाडी घेतलेल्या काँग्रेसची 35 पर्यंत घसरण झाली आहे. हरियाणा विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 45 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजप या आकड्याच्या पुढे आहे. यावरून आता कैथलमधील काँग्रेसचे उमेदवार आदित्य सुरजेवाला प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, “दोन फेऱ्या पाहून आत्ताच काही सांगता येणार नाही, १-२ तासात परिस्थिती स्पष्ट होईल. तिसऱ्या फेरीत आम्ही २६०० मतांनी आघाडीवर आहोत आणि हा फरक वाढेल. पुढे काँग्रेसचे सरकार प्रचंड बहुमताने येत आहे.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. Haryana Election Results 2024 । हे नवे चेहरे विजयाची नोंद करू शकतील का? Haryana Election Results 2024 । विधानसभा निवडणुकीत अनेक बलाढ्य व्यक्तिमत्त्वांची विश्वासार्हता पणाला लागली आहे, निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश करणारे काही चेहरे आहेत, ज्यात कुस्तीपटू विनेश फोगटचाही समावेश आहे. विनेश जुलाना येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. याशिवाय रणदीप सिंह सुरजेवाला यांचा मुलगा आदित्य सुरजेवालाही आपली राजकीय इनिंग सुरू करत आहे. ते कैथलमधून रिंगणात आहेत. यावेळी निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली आणि काही प्रसिद्ध चेहरे अपक्ष म्हणून लढले. Haryana Election Results 2024 । व्हीआयपी उमेदवार कोण आहेत? निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री सैनी (लाडवा), विरोधी पक्षनेते हुडा (गढ़ी सांपला-किलोई), आयएनएलडीचे अभय चौटाला (एलेनाबाद), जेजेपीचे दुष्यंत चौटाला (उचाना कलान), भाजपचे अनिल विज (अंबाला कँट), कॅप्टन अबी (नारनौंद), ओपी धनखर (बदली), आपचे अनुराग धांडा (कलायत) आणि काँग्रेसच्या विनेश फोगट (जुलाना). माजी खासदार आणि भाजप नेते श्रुती चौधरी आणि अनिरुद्ध चौधरी तोशाम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. Haryana Election Results 2024 । हरियाणात 65.65 टक्के मतदान हरियाणातील 20,354,350 मतदारांपैकी 65.65 टक्के मतदारांनी मतदानात भाग घेतला. मतदानाच्या दिवशीही राजकीय पक्षांमध्ये हाणामारी झाली होती, त्यानंतर सुरक्षाही वाढवण्यात आली होती.