Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास केंद्राकडुन विलंब; काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

अकोला : केंद्र सरकारने राज्य प्रशासनाकडून औपचारिक प्रस्ताव मागितल्याने महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास विलंब केल्याचा आरोप काँग्रेसने सोमवारी केला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत पॅकेज मिळवून देण्यात अपयशी झाल्याचा आरोप केला आहे.
शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत असताना, भाजप सरकार उदासीन आहे. महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवल्यानंतरच मदत दिली जाईल असे म्हणणे असंवेदनशीलता आणि विलंबाची युक्ती दोन्ही दर्शवते. शेतकऱ्यांनी सर्वस्व गमावले आहे. प्रस्तावाची वाट पाहण्याची काय गरज आहे? अमित शहा यांच्या भेटीपूर्वी केंद्राने व्यापक मदत पॅकेज जाहीर करायला हवे होते, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी रविवारी दिले होते, त्या वक्तव्याला सपकाळ उत्तर देत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रस्ताव न घेता दिल्लीला गेले आणि रिकाम्या हाताने परतले, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे. विदर्भातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद काँग्रेस नेत्याने भूषवले.





