Harshwardhan Sapkal : काँग्रेसने आघाडी धर्म पाळला; हर्षवर्धन सपकाळ यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी ठाकरेसेनेला मतदान केले, असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

Harshwardhan Sapkal : चंद्रपुरमध्ये ठाकरेसेनेने भाजपला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही. पण काँग्रेसने परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये ठाकरेसेनेचा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी ठाकरेसेनेला मतदान केले, असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, चंद्रपूर महापालिकेत ठाकरेसेनेने जी भूमिका घेतली त्याची सल असण्याची अथवा बदला घेण्याची भूमिका व संस्कृती काँग्रेसची नाही. चंद्रपुरात ठाकरेसेनेचे 8 नगरसेवक असताना त्यांनी भाजपला मतदान केले, हे राजकीय दृष्टीकोनातून चुकलेले आहे. परंतु, त्याचे पक्ष पातळीवरून समर्थन केले जाते, काँग्रेसची लाज काढली जाते, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत.
चंद्रपुरसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होती. काँग्रेसचे नेते सातत्याने संपर्कात होते, असे असताना संजय राऊत व त्यांच्या पक्षातील नेत्यांनी जी वक्तव्ये केली ती चुकीची असून, आघाडी धर्माला शोभणारी नाहीत.
वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसचा मित्र पक्ष आहे, त्यांचे २ नगरसेवक गैरहजर राहिले, त्यांना पक्षाने बडतर्फ केले. तसेच शहराध्यक्षांवरही कारवाई केली. पण ठाकरेसेनेने मात्र कोणतीच कारवाई केली नाही, उलट त्याचे समर्थन केले, हे काँग्रेस पक्ष कदापी सहन करणार नाही. परभणीत काँग्रेसचा महापौर करण्यासंदर्भात आमच्याकडे प्रस्ताव होता. पण सत्तेसाठी वाट्टेल ते ही काँग्रेस पक्षाची भूमिका नाही.
आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला व ठाकरेसेनेच्या पाठीशी उभे राहिलो. आघाडीत ठाकरेसेना काँग्रेसची मते घेते. पण काँग्रेसला मत करत नाही. यावर चंद्रपूर व परभणीतील घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहे, असेही सपकाळ म्हणाले.






