Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
केंद्र आणि महाराष्ट्र राज्यातील भाजप सरकारविरोधात तरुणांमध्ये तीव्र संताप असून, त्यांचे आवाज दाबण्यासाठीच गुन्हे दाखल केले जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी शनिवारी केला.

Harshwardhan Sapkal : केंद्र आणि महाराष्ट्र राज्यातील भाजप सरकारविरोधात तरुणांमध्ये तीव्र संताप असून, त्यांचे आवाज दाबण्यासाठीच गुन्हे दाखल केले जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी शनिवारी केला.
शुक्रवारी शिवाजी पार्कवर झालेले आंदोलन हे याच असंतोषाची अभिव्यक्ती होती, असे सांगतानाच तरुणांवर दाखल केलेल्या खटल्यांमुळे ते मागे हटणार नाहीत, असा इशाराही त्यांनी (Harshwardhan Sapkal) दिला.
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणातील कथित अनियमिततेप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने या मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न बिकट स्वरूपाचे आहेत. सरकार दबावाच्या जोरावर लोकांचे आवाज दाबू शकत नाही. जर भाजपने असा प्रयत्न केला, तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा सपकाळ यांनी दिला.
दोन निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी कथितपणे पाठवलेल्या पत्रांवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मौन का बाळगून आहेत? असा सवाल करत भाजपने यावर उत्तर द्यावे. लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने हिंदू-मुसलमान आणि भारत-पाकिस्तानचे मुद्दे काढणे बंद केले पाहिजे.
नाशिकहून मुंबईकडे निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च आणि एमपीएससीच्या कथित गैरव्यवहाराविरोधात पुण्यातील विद्यार्थ्यांची आंदोलने ही तरुणांमधील असंतोषाची चिन्हे असल्याचे सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी नमूद केले.
विद्यार्थी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या हकालपट्टीची मागणी करत आहेत, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. भिमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसारखे वागावे, मी नाहीच अशी भूमिका घेऊ नये, असा टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. राज्यातील त्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपयांच्या मदतीसह एका विशेष पॅकेजची घोषणा होईल, अशी त्यांना आशा आहे.
आगामी विधानपरिषद निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या महाविकास आघाडीत कोणताही बेबनाव नाही. पाचपैकी दोन जागांवर काँग्रेसचे विद्यमान सदस्य आहेत आणि पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.अमरावतीच्या जागेसाठी उमेदवाराची घोषणा झाली असून उर्वरित जागांवर चर्चा सुरू आहे. समन्वयासाठी लवकरच बैठक पार पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






