मुंबई : देशात आणि महाराष्ट्रात भाजपचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भाजप आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. भाजपला अनुकूल नावे समाविष्ट करणे व विरोधांना अनुकुल असलेल्यांची नावे वगळणे, एकाच घरात 80 किंवा 100 मतदार, घर नंबर नसलेल्यांची नावे आणि वयांमध्ये फेरफार असे अनेक प्रकारचे गोंधळ या यादीत आहेत. मतदारांची वाढलेली संख्या सुद्धा अनाकलनीय आहे. याचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर केलेले आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून जी उत्तरे दिली जात आहेत, ती समाधानकारक नाहीत व पटणारीही नाहीत. निवडणूक आयोगाची भूमिका कठपुतली बाहुल्यासारखी आहे. निवडणूक आयोगाचा कारभार पहाता त्यांच्याविरोधात निघणाऱ्या मोर्चात काँग्रेस पक्ष बरोबर असेल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.