Harshwardhan Sapkal : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई : सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही निर्णय मागे घेतल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यानंतर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
सपकाळ म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीपासूनच एकत्र निवडणुका लढवत आहेत. 2019 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने निर्णय घेतला आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) स्थापन झाली. भाजपला रोखण्यासाठीच राज्यात आणि देशात इंडिया आघाडी निर्माण झाली. आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र लढलो, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणतीही आघाडी किंवा युती केली नाही.”
ते पुढे म्हणाले, “स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांसोबत युती करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आले आहेत. सध्या समविचारी पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट. काँग्रेसच्या मूल्यांशी जुळणाऱ्या पक्षांसोबत आम्ही पुढे जाऊ. याबाबत व्यापक स्वरूपाचा निर्णय लवकरच घेतला जाईल.”
विजयी मेळाव्याबाबत बोलताना सपकाळ म्हणाले, “मराठी विषयाच्या विजयानिमित्त ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन हा जल्लोष साजरा केला. आगामी काळात दोन्ही पक्षांकडून स्पष्टीकरण मिळाल्यावर युतीबाबत चर्चा होऊ शकते. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा निर्णय स्थानिक काँग्रेस कमिटीवर सोपवण्यात आला आहे. निवडणुका कधी होणार, फेब्रुवारीत की ऑक्टोबरमध्ये, याबाबत अनिश्चितता आहे. भाजपाचा खरा हेतू हा मूळ मुद्द्यांपासून लक्ष भटकवणे हाच आहे.”
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन तिसरी आघाडी निर्माण करतील आणि यामुळे महाविकास आघाडीत फूट पडेल, असा अंदाज महायुतीतील काही नेते व्यक्त करत आहेत. याचा फायदा महायुतीला होऊ शकतो, असेही त्यांचे मत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी आणि युतीचे समीकरण कसे असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





