मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान चोरीचा पॅटर्न आगामी बिहार विधानसभा निवडणूक, मुंबई महानगरपालिका निवडणूक तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही वापरण्याचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी येथे केला. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता आणि लोकशाहीवरील घाला या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने येत्या 12 जून रोजी राज्यभर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. गडचिरोली येथील मोर्चात आपण सहभागी होणार असल्याचे सपकाळ यांनी जाहीर केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये मतदानाची चोरी करून भाजपाप्रणित महायुती सत्तेत आले. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेसने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. पण चौकशी काही केली जात नाही. राहुल गांधी यांनी संसदेत आणि संसदेबाहेरही हा प्रश्न लावून धरला आहे. आज देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रात त्यांचा या विषयावर लेख प्रकाशित झाल्याने या निवडणूक फिक्सिंगच्या चौकशीची मागणी होत आहे, असे सपकाळ म्हणाले. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदानाच्या घोटाळ्याचा प्रश्न आकडेवारीसह मांडला आहे. हा आरोप नाही तर, तथ्य आणि आकडेवारीसह त्याची मांडणी करून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. हा लोकशाही व्यवस्थेबाबत निर्माण झालेला गंभीर आणि चिंताजनक मुद्दा आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडेही हा मुद्दा सविस्तरपणे मांडला. पण त्यांनी खुलासा करून वस्तुस्थिती मांडण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर नियमातच बदल करून व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच माहिती देता येणार नाही, असा नवा फतवा काढला आहे. हा लोकशाहीवरचा घाला आहे. काही गौडबंगाल नाही तर मग माहिती का लपवली जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.