Harshvardhan Patil : साखर उद्योगासमोर मोठी आव्हाने; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला भविष्यातील प्रगतीचा ‘हा’ मंत्र
Harshvardhan Patil : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हर्षवर्धन पाटील आणि भाग्यश्री पाटील यांचा विशेष सन्मान; विक्रमी दराने बिल केल्याबद्दल कौतुक.

Harshvardhan Patil – साखर कारखान्यांच्या हंगामातील ऊस गाळपाचे दिवस कमी होत असल्याने उद्योगासमोर आव्हाने उभी राहत आहेत. त्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करून ऊस गाळप वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा साखर कारखान्याच्या कार्यस्थळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
चालू 2025-26 हंगामात कारखान्याने प्रति टन 3101 रुपयांप्रमाणे ऊस बिलाची संपूर्ण रक्कम राज्यात सर्वप्रथम अदा केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांचा सन्मान करण्यात आला. पाटील म्हणाले, नीरा- भीमा कारखान्याने चालू हंगामात ५, २५,६५७ टन ऊस गाळप करून १० फेब्रुवारी रोजी हंगामाची सांगता केली. अपेक्षेपेक्षा गाळप कमी झाल्याची कारणे दुरुस्त करण्यात येतील.
भविष्यात स्पर्धेत टिकण्यासाठी मल्टिफीड संकल्पना आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅससारखे पूरक प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी नोंदवलेला सर्व ऊस कारखान्याकडे देण्याची मानसिकता ठेवावी. (दि.२८) फेब्रुवारीपर्यंत ऊस नोंदी पूर्ण कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याच्या चेअरमन भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, शिस्त, नियमपालन आणि कौशल्यपूर्ण व्यवस्थापनामुळे कारखान्याने प्रगती साधली आहे.
शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिल देण्याचा शब्द पुढेही पाळला जाईल. आगामी 2026-27 हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील, राजवर्धन पाटील व संचालक, पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




