Harshil Kalia Death: मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानी मॉडेल आणि अभिनेत्री हर्षिल कालिया यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. अवघ्या ३० वर्षांच्या वयात त्यांचा मृत्यू झाल्याने चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात जयपूरमधील शिप्रा पथ रोडवर उशिरा रात्री घडला. हर्षिल कालिया या आपल्या कामावरून घरी परतत असताना त्यांची कार अचानक अनियंत्रित झाली. कारचा वेग जास्त असल्याने वाहनाचा तोल गेला आणि कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली. या जोरदार धडकेनंतर कार उलटली आणि अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा झाला. Harshil Kalia अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांनी कार सरळ करून हर्षिल यांना बाहेर काढले. त्या वेळी त्या गंभीर जखमी अवस्थेत होत्या. तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच मनोरंजन क्षेत्रातील सहकारी कलाकार आणि चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. हर्षिल कालिया या राजस्थानी मनोरंजन क्षेत्रात ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी एक होत्या. त्यांनी ‘क्राइम नेक्स्ट डोर’ या वेब सिरीजमध्ये काम केले होते. याशिवाय त्यांनी अनेक राजस्थानी म्युझिक व्हिडिओंमध्येही भूमिका साकारल्या होत्या. मॉडेलिंग क्षेत्रातही त्या सक्रिय होत्या आणि सोशल मीडियावर त्यांची चांगली फॅन फॉलोइंग होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी अशी प्रार्थना केली आहे. एक उमदी आणि उभरती कलाकार अशा दुर्दैवी पद्धतीने आपल्यातून निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.