Satej Patil : बिलासाठी संघर्ष करत करत हर्षल गेला; सतेज पाटलांनी दिला कुटुंबीयांना धीर

सांगली : वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील ३५ वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे १.४ कोटी रुपये थकित असल्याने आर्थिक संकटात येऊन मंगळवारी (२२ जुलै) आत्महत्या केली. या घटनेने राज्यभर संतापाची लाट पसरली असून, महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या ८९,००० कोटी रुपये थकित असल्याच्या मुद्द्याने पुन्हा जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांनी हर्षल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला.
सतेज पाटील हर्षल यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर म्हणाले की, हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनच्या कामाचे बिल न मिळाल्याने आत्महत्या केली, ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाची आणि मेहनतीची कहाणी ऐकून मन सुन्न झाले.” त्यांनी हर्षल यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सतेज पाटील यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर टीका करताना कंत्राटदारांच्या थकित बिलांचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.
सांगलीचा होतकरू आणि प्रामाणिक बांधकाम कंत्राटदार हर्षल पाटील यांनी ‘जलजीवन’च्या कामाचे बिल न मिळाल्याने आत्महत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. हर्षलच्या संघर्षाची, त्याच्या कामावरील निष्ठेची आणि… pic.twitter.com/cwa2o53lUs
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) July 25, 2025
सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
दरम्यान, आमदार सदाभाऊ खोत यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर तीव्र टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. खोत म्हणाले, “हर्षल पाटील हा उपकंत्राटदार होता आणि मुख्य कंत्राटदारामार्फत काम करत होता. तरीही त्याला पैसे मिळाले नाहीत. मंत्र्यांनी जबाबदारीने काम करायला हवे होते. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे नवतरुण निराश होत आहेत.
गुलाबराव पाटील यांनी तातडीने राजीनामा द्यावा.” खोत यांनी कंत्राट पद्धतीत बदलाची मागणी करत सिव्हिल इंजिनीअर्सना ५ कोटींपर्यंतच्या कामांसाठी लायसन्स देण्याची सूचना केली. ते म्हणाले, “अनुभवाची मागणी केली जाते, पण अनुभव मिळवण्यासाठी काम मिळाले पाहिजे. नाहीतर तरुणांनी अमेरिकेत जाऊन अनुभव घ्यायचा का? डिग्री चुलीत घालायची का?” असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला.





