“अनलॉक’बाबत सरकारमध्ये सुसंवाद; अनिश्चिततेच्या गोंधळावर पडदा टाकण्याचा अजित पवारांचा प्रयत्न

श्रीवर्धन – “अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असते. मात्र, अनलॉक करण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाने तत्वत: मंजुरी दिली आहे’ असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील लॉकडाऊन उठवण्यावरून गुरुवारी निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
श्रीवर्धन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे आदी उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक होणार असल्याची माहिती दिली होती. करोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या निकषावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे आणि हे जिल्हे टप्प्याटप्प्याने निर्बंधमुक्त होतील, असे त्यांनी सांगितलं होते.
शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असेही ते म्हणाले होते. ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत खुलासा केला’. असा कुठलाही निर्णय झालेला नाही. निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव केवळ विचाराधीन आहे’, असे या खुलाशात म्हटले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. विजय वडेट्टीवार यांनी काल त्यावर स्पष्टीकरण दिले होते. मात्र, विरोधी पक्षाने हे निमित्त साधून राज्य सरकारवर टीकेची संधी साधली.
पवार म्हणाले, “अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. करोनाची साथ आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: सोशल मीडियाच्या व टीव्हीच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. संवाद साधतात. अनेक गोष्टींची माहिती देतात’.
ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या पाच टाक्यांच्या आत असेल त्याठिकाणी त्या जिल्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल. दर आठवड्याला कोरोनाचा प्रमाण जास्त असेल अशा भागात आढावा घ्यायचा. असे आमचे म्हणजे राजेश टोपे आणि माझे ठरले आहे. त्याप्रमाणे आज तोक्ते वादळ व कोरोना पार्श्वभूमीवर आढावा बैठक आज श्रीवर्धन येथे घेण्यात आली.
यामध्ये तिसऱ्या लाटेची काय तयारी आहे याचा आढावा घेतला गेला. यदाकदाचित तिसरी लाट आली तर कश्या प्रकारे काम करायच यावर चर्चा करण्यात आली. म्यूकर मायक्रोस्सीस सारख्या महाग औषधांवरील जी एस टी कमी करण्यासाठी मी माझी भूमिका जीएसटी परिषदेच्या बैठकीत मांडली आह, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
करोना पसरवू नका
कुंभमेळा, विधानसभा निवडणूक ज्या राज्यात झाल्या त्याठिकाणी कोरोना वाढला त्यामुळे माझं मोर्चाचे आवाहन करणाऱ्यांना विनंती आहे ज्याने कोरोना वाढेल अस काही करू नये, आरक्षण मिळाल पाहिजे पण जनतेच्यात कोरोना पसरला नाही पाहिजे याची दक्षता घ्यावी.





