Harmeet Dhillon : भारतीय वंशाचे हरमित धिल्लन ट्रम्प प्रशासनात; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…..

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भावी प्रशासनामध्ये सिव्हील राईटससाठी ऍटर्नी जनरलपदावर भारतीय वंशाच्या हरमित धिल्लन यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या न्याय विभागामध्ये नागरी हक्कांसाठीच्या ऍटर्नी जनरलपदावर हरमित धिल्लन यांची नियुक्ती केली जाईल, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हरमित धिल्लन यांनी आपल्या करिअरमध्ये नेहमीच नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी आवाज उठवला आहे. निवडणूक कायद्यामधील सर्वोत्तम वकिलांपैकी त्या एक आहेत. सर्व आणि केवळ वैध मतांचीच मोजणी केली जावी, यासाठी त्या संघर्ष करत असतात. त्या डार्टमाउथ कॉलेज आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया लॉ स्कूलमधील पदवीधर असून, यूएस फोर्थ सर्किट कोर्ट ऑफ अपीलमध्ये कार्यरत असल्याचे ट्रम्प म्हणाले.
हरमित धिल्लन या शीख समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यात रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अरदासचे गायन त्यांनी केले होते. याबद्दल त्यांच्यावर वांशिक टीका झाली होती. रिपब्लिकन नॅशनल कमिटी चेअरमनशीपसाठीची निवडणूक देखील त्यांनी लढवली होती. चंदिगडमध्ये जन्मलेल्या हरमित अगदी लहानपणीच आपल्या पालकांसोबत अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत.





