Hartalika, Ganesh Chaturthi: आधी हरितालिका की आधी गणपती? यंदा एकाच दिवशी सण, जाणून घ्या पूजेचा योग्य क्रम
Hartalika, Ganesh Chaturthi यंदा दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने गोंधळून जाण्याची गरज नाही. आपल्या घरची परंपरा, पूजेची पद्धत आणि उपलब्ध मुहूर्त लक्षात घेऊन पूजन करता येईल.

Hartalika, Ganesh Chaturthi: यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी हरितालिका व्रत आणि गणेश चतुर्थीचा सण एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे की, आधी हरितालिकेचं पूजन करायचं की आधी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची? दोन्ही व्रतं एकाच दिवशी आल्यामुळे अनेक घरांमध्ये याबाबत संभ्रम आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंचांगकर्ते यांच्या म्हणण्यानुसार, हरितालिका व्रत आणि गणेश चतुर्थी ही दोन्ही स्वतंत्र व्रतं आहेत. त्यामुळे हरितालिका बसवल्यानंतरच गणपतीची स्थापना करावी, असा कोणताही नियम नाही. घरातील परंपरा आणि पद्धतीनुसार दोन्ही पूजन करता येऊ शकतं.
आधी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करता येते का?
होय. घरात आधी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करता येते आणि त्यानंतर हरितालिकेचं पूजनही करता येतं. गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ठराविक वेळेची सक्ती नसते. मात्र, गणपतीच्या विशेष पूजेसाठी मध्यान्ह काळ महत्त्वाचा मानला जातो. सूर्योदयापासून मध्यान्ह काळ संपेपर्यंत म्हणजेच साधारण सकाळी सव्वा अकरा ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत गणपतीचं विशेष पूजन करता येतं. त्यामुळे गणपतीच्या पूजेचा हा काळ महत्त्वाचा मानला जात आहे.
हरितालिका पूजनाचा मुहूर्त कधी?
हरितालिका व्रतासाठी सूर्योदयानंतरचा प्रातःकाळ महत्त्वाचा असतो. सूर्योदयानंतर साधारण दोन तासांच्या कालावधीत हरितालिकेचं पूजन करण्याचा मुहूर्त असतो. यंदा तृतीया तिथीला हरितालिका व्रत येत असल्याने या काळात पूजन करण्यास सांगितलं आहे.
हरितालिकेच्या पूजेमध्ये महिला व्रत आणि पूजन करतात. तर गणपतीची प्राणप्रतिष्ठा घरातील कर्ता पुरुष करत असल्याची अनेक ठिकाणी परंपरा आहे. काही घरांमध्ये महिलाही गणपतीची स्थापना करतात. त्यामुळे दोन्ही पूजांची पद्धत आणि कर्ते वेगवेगळे असू शकतात.
मग नेमकं आधी काय करायचं?
याचं उत्तर अगदी सोपं आहे. हरितालिका आधीच बसवली पाहिजे आणि त्यानंतरच गणपतीची स्थापना केली पाहिजे, असा नियम नाही. घरच्या परंपरेनुसार आधी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून त्यानंतर हरितालिकेचं पूजन करता येऊ शकतं. मात्र, दोन्ही पूजांसाठी दिलेल्या मुहूर्ताचा विचार करणं महत्त्वाचं आहे. हरितालिकेसाठी सूर्योदयानंतरचा प्रातःकाळ महत्त्वाचा आहे, तर गणपतीच्या विशेष पूजेसाठी मध्यान्ह काळ सांगण्यात आला आहे.
यामुळे यंदा दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने गोंधळून जाण्याची गरज नाही. आपल्या घरची परंपरा, पूजेची पद्धत आणि उपलब्ध मुहूर्त लक्षात घेऊन पूजन करता येईल. हरितालिका आणि गणेश चतुर्थी ही दोन्ही स्वतंत्र व्रतं असल्याने एका पूजेचा दुसऱ्या पूजेवर बंधनकारक क्रम नाही, असं पंचांगकर्त्यांचं म्हणणं आहे.
त्यामुळे यंदा १४ सप्टेंबरला हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. योग्य मुहूर्त आणि घरची परंपरा लक्षात घेऊन भक्तिभावाने दोन्ही पूजन करता येणार आहे.




