गांधीनगर : गुजरातमधील भारतीय जनता पार्टीचे आमदार हार्दिक पटेल यांनी त्यांच्याच सरकारविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे आणि समस्यांबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी प्रकल्पांचे काम सुरू न झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. समस्या सोडवल्या नाहीत तर स्वतःच्या सरकारविरुद्ध धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हार्दिक यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या भागातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा उल्लेख केला आहे. हार्दिक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आरोप केला आहे की ७ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ज्या अंडर वॉटर ड्रेनेज लाइन सिस्टीमची पायाभरणी केली होती, त्याचे एक टक्काही काम पूर्ण झालेले नाही. त्यांच्या विधानसभा मतदारसंघ विरमगाममध्ये नाले ओसंडून वाहत आहेत आणि घरांमध्ये घाण पाणी शिरत आहे. हार्दिक म्हणाले की ११ केव्ही अंडरग्राउंड लाईटचे एक टक्काही काम पूर्ण झालेले नाही. हार्दिकने सरकारला इशारा दिला आहे की जर विरमगामच्या लोकांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर ते त्यांच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे राहतील आणि गरज पडल्यास धरणे देखील देतील.